मुंबई : अडचणीच्या काळात पीएफच्या पैशांचा वापर केला जातो. जर तुमचे देखील पीएफ खाते असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. पीएफ मधून मिळणाऱ्या रक्कमेचा आपण अनेक गोष्टींसाठी वापर करतो. नोकरी सोडल्यावर ठराविक कालावधीनंतर आपल्याला पीएफचे पैसे मिळतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीएफकडे नेहमीच एक उत्तम गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. केंद्रीय विश्वस्त मंडळ दरवर्षी चालू आर्थिक वर्षाचे व्याजदर निश्चित करते. यानुसार आपल्या पीएफ खात्यावर किती व्याज मिळेल हे ठरते. गेल्या काही काळापासून हा व्याजदर घसरला आहे. तरीसुद्धा नोकरदारांसाठी पीएफ हा गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहे. या चालू आर्थिक वर्षाचे व्याजदर, वर्षाच्या शेवटापर्यंत ठरेल. सध्या पीएफ खात्यावर ८. ५५ टक्के इतके व्याजदर आहे. कर्मचाऱ्याच्या पगाराचा १२ टक्के भाग पीएफ म्हणून कापला जातो. पण याव्यतिरिक्त पीएफ खात्याचे अनेक फायदे आहेत.


 


१. सहा लाखांचा विमा


पीएफ खातेधारकाला ६ लाखांचा विमा मिळतो. 'कर्मचारी ठेवी विमा' या योजनेनुसार कर्मचाऱ्याला त्याच्या खात्यावर ६ लाखांचा विमा मिळतो. या योजनेनुसार खातेधारकाला एक ठराविक रक्कम मिळते. या रक्कमेचा उपयोग अपघात किंवा मृत्यूच्या वेळी करता येतो.


२. निवृत्तीवेतन


सलग १० वर्षे जर खातेधारकाने आपल्या खात्यात पैसे जमा केल्यास 'कर्मचारी निवृत्तीवेतन' या योजनेचा लाभ मिळतो. खातेधारक जर सलगपणे एकाच ठिकाणी १० वर्षे नोकरी करत असेल, त्याच्या खात्यात ठराविक रक्कम जमा होत असेल तर, त्या कामगाराला 'कामगार निवृत्ती योजना १९९५' नुसार निवृत्तीनंतर दरमहा १ हजार रुपये पेन्शन रुपात मिळेल.


३. निष्क्रिय खात्यांवरसुद्धा व्याज


ईपीएफओने गेल्याच वर्षी निष्क्रिय खात्यांवर व्याज देण्याचा निर्णय घेतला होता. याआधी निष्क्रिय खात्यांवर व्याज मिळत नसे. सलग ३ वर्षांपासून बंद असलेल्या निष्क्रिय खात्यांवर व्याज मिळणार आहे. ३ वर्षांपासून ज्या खात्यावर व्यवहार होत नाहीत, अशा खात्यांना निष्क्रिय खात्यांच्या यादीत टाकले जाते. सुत्रांनुसार, नोकरी बदलल्यानंतर लगेचच आपलं पीएफ खाते, बदलून घ्यायला हवे. यामुळे आपल्याला ठराविक रक्कमेवर व्याज मिळेल. खातेधारकाने असे न केल्यास त्याला नियमांनुसार ५ वर्षांपेक्षा जास्त काळ निष्क्रिय असलेल्या खात्यावर व्यवहार करताना टॅक्स द्यावा लागेल.


४. आपोआप ट्रान्सफर होणार खाते


नोकरी बदलल्यानंतर पीएफ खात्याच्या तपशीलात बदल करावे लागतात. आपल्या नव्या नोकरीचा पत्ता पीएफ कार्यालयात द्यावा लागतो. त्यासाठी कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागतात. पण आता नोकरी सोडल्यानंतर आधार कार्ड सोबत लिंक असलेल्या युएएन नंबरच्या मदतीने आपोआप पीएफ खात्यातील पैसै ट्रांन्सफर करण सोप्पे होणार आहे. तसेच नव्या ठिकाणी नोकरीस रुजू झाल्यानंतर पीएफचे पैसे मिळवण्यासाठी फॉर्म- १३ भरण्याची आवश्यकता नाही. याऐवजी पीएफच्या वतीने फॉर्म -११ सुरु केला आहे. यामुळे खातेधारकाचे जुने खाते नव्या खात्यात आपोआप बदलले जाईल.


५. अडचणीत पैसे काढण्याची सोय


नोकरी सोडल्यानंतर लगेचच कर्मचारी आपल्या खात्यातून पैसे काढतात. कामावर रुजू असताना पैसै काढू शकत नाही, असा एक समज आहे. पण हा समज चुकीचा आहे. काही आपात्कालीन परिस्थितीत खातेधारकांना पैसे काढण्याची सोय आहे. पण पैसे काढण्यावर मर्यादा आहेत. घर बांधण्यासाठी, घर दुरुस्तीसाठी, शिक्षणासाठी तसेच विवाह कार्यासाठी खातेधारक पैसे काढू शकतात. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी खातेधारकाला निश्चित काळापर्यंत इपीएफओचे सदस्य असणे, बंधनकारक आहे.