भोपाळ: साध्वी प्रज्ञा यांना भोपाळमधून उमेदवारी देणे ही भाजपकडून झालेली मोठी चूक आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाला याचा फटका बसू शकतो, असे वक्तव्य रिपाईचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांनी केले. ते सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, साध्वी प्रज्ञा यांना उमेदवारी देणे भाजपची वैयक्तिक बाब आहे. मात्र, साध्वींच्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे पक्षाचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे भाजपने साध्वी प्रज्ञा यांच्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. अन्यथा लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागेल, असा इशाराही यावेळी आठवले यांनी दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच साध्वी प्रज्ञा यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचाही आठवले यांनी निषेध केला. एका शहीद अधिकाऱ्याविषयी अशी भाषा वापरणे चुकीचे आहे.  मालेगाव बॉम्बस्फोटात साध्वी प्रज्ञा यांचे नाव होते आणि तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याकडे या प्रकरणात सबळ पुरावे होते. दहशतवाद्यांशी लढताना करकरे शहीद झाले. करकरे यांच्यासंदर्भात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी दिलेल्या विधानाशी मी सहमत नाही. मी त्या विधानाचा निषेध करतो. आता न्यायालयच योग्य आणि अयोग्य काय, याचा फैसला करेल, असेही आठवले यांनी सांगितले. 


साध्वी प्रज्ञा यांची भोपाळमधील उमेदवारी सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरली आहे. साध्वी प्रज्ञा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांविषयी निवडणूक आयोगाकडूनही स्पष्टीकरण मागवण्यात आले होते. यावरून विरोधकांनीही सरकारला भाजपला धारेवर धरले होते. या सगळ्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे.