ऐन दिवाळी गाव भकास; `इथं` एका शापापोटी कधीच साजरा नाही होत दिव्यांचा सण...
India Diwali 2024 : कोणी दिला शाप? गावकऱ्यांना कसली भीती? सारं जग दिवाळी उत्साहात साजरी करत असतानाच हे गाव इतकं भकास का?
India Diwali 2024 : प्रकाशपर्वाच्या निमित्तानं सध्या संपूर्ण देशभरात एक वेगळाच माहोल पाहायला मिळत आहे. सानथोर, गरीब श्रीमंत, प्रत्येकजण त्यांच्यात्यांच्या परिनं हा सण साजरा करताना दिसत आहेत. असं असलं तरीही भारतात एक असं गाव आहे, जेथील गावकरी हा सण साजरा करत नाही आहेत. यामागचं कारण आहे ती म्हणजे एक परंपरा.
असं म्हटलं जातं की, शतकानुशतकांपूर्वी दिवाळीच्याच दिवळी एक महिला सती गेल्यानं तिच्याकडून मिळालेल्या अभिशापाच्या भीतीनं या गावातील गावकरी दिवाळीचा सण साजरा करत नाहीत. हिमाचल प्रदेशातील या गावाचं नाव आहे, सम्मू. दिवाळीच्या मंगलपर्वात एखाद्या अपशकुनी घटनेची भीती या गावातील गावकऱ्यांना सतावत असते. ज्यामुळं इथं हा सणच साजरा केला जात नाही.
अशी दंतकथा आहे की, कैक वर्षांपूर्वी एक महिला इथं तिच्या माहेरी दिवाळीसाठी आली होती. पण, त्याचवेळी तिला तिच्या पतीच्या मृत्यूची बातमी मिळाली. तिचा पती राजदरबारी सैनिक होता. पतीचा वरह ती गर्भवती महिला सहन करू शकली नाही आणि तिनं पतीच्या चितेवरच स्वत:चंही आयुष्य संपवलं. तुम्ही कधीच दिवाळी साजरा करु शकणार नाहीत... असा शाप तिनं चितेवर असताना दिला. त्या दिवसापासून या गावात कधीच दिवाळी साजरी झाली नाही असं म्हटलं जातं.
हेसुद्धा वाचा : Diwali 2024 : जहीर खान, सागरिकाच्या घरची दिवाळी; साग्रसंगीत फराळ अन् देवघराचे PHOTO पाहाच
गावातील काही ज्येष्ठांच्या माहितीनुसार त्यांनी 70 वर्षांहून अधिक वर्षे दिवाळीचा सण जाताना पाहिला. पण इथं कधीच सण साजरा झाला नाही. जेव्हाकेव्हा कोणीही दिवाळी साजरा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा इथं अनेक अपशकुनी घटना घडल्या. ज्यामुळं सणावारालाही इथली मंडळी घरातच राहू लागली. एका शापामुळं या गावातील नागरिकांच्या मनात इतकी भीती बसली, की त्यांनी सणवार साजराच करणं सोडलं.... जरा विचित्र असलं तरीही हे गाव आणि त्याची ही कहाणी सर्वांनाच थक्क करणारी आहे बरं.