नवी दिल्ली: बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) जाळ्यात सापडलेले काँग्रेस नेते डी. शिवकुमार (DK ShivaKumar)  यांच्या चौकशीला आता वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे. डी.के. शिवकुमार यांनी आपल्याकडील काळा पैसा अखिल भारतीय काँग्रेस समितीकडे (AICC) सोपविल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता ईडीकडून काँग्रेसचे सचिव विजय मुळगूंद यांची चौकशी होणार आहे. आज सकाळी ११ वाजता त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी ईडीकडून त्यांना डी.के. शिवकुमार आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीमधील व्यवहारांविषयी विचारणा होण्याची शक्यता आहे. विजय मुळगूंद यांनी डी.के. शिवकुमार यांच्याकडील काळे धन AICC पर्यंत पोहोचवल्याचा संशय ईडीला आहे. याशिवाय, ईडीकडून अखिल भारतीय काँग्रेस समितीचे आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांचीही चौकशी केली जाऊ शकते. 


काही दिवसांपूर्वीच आयकर विभागाने विजय मुळगूंद यांच्या मालमत्तांवर छापे टाकले होते. ते डी.के. शिवकुमार यांच्या निकटवर्तींयांपैकी एक असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आता विजय मुळगूंद यांच्या चौकशीतून आणखी काही नवीन माहिती समोर येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 



तत्पूर्वी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी सकाळी तिहार तुरुंगात जाऊन डीके शिवकुमार यांची भेट घेतली. शिवकुमार यांची विचारपूस करण्यासाठी तसेच त्यांच्याप्रती आत्मियता दाखवण्यासाठी सोनिया गांधी तिहारमध्ये गेल्याचे एका काँग्रेस नेत्याने सांगितले. यापूर्वी सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी पी.चिदंबरम यांची तिहार कारागृहात जाऊन भेट घेतली होती.