ड्रायव्हींगवेळी गुगल मॅपचा वापर पडू शकतो महागात
मोबाईल हातात धरुन गूगल मॅप वापरणं तुमच्या खिशाला भारी पडू शकतं.
नवी दिल्ली : आजच्या युगात, एखाद्याला रस्ता विचारण्याऐवजी लोक नेव्हिगेशनद्वारे पाहीजे त्या ठिकाणी जाण्याला पसंती देतात. यामुळेच गुगल मॅपचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. पण जर तुम्ही वाहन चालविताना मोबाईल हातात धरुन गूगल मॅप वापरत असाल तर ते तुमच्या खिशाला भारी पडू शकतं.
सहसा वाहन चालवताना लोक गुगल मॅप (Google Map)चे नॅव्हिगेशन चालू करतात. यामुळे आपल्याला मार्गाविषयी नेमकी माहिती मिळते. जाण्याच्या मार्गावार ट्राफीक जाम असल्यास ते देखील आधीपासूनच कळते. असं असल्याच चालक दुसरा मार्ग निवडतो. हे गुगल मॅपचे सर्व फायदे आहेत पण त्याचबरोबर त्याचे काही तोटेही आहेत.
जर आपण आपल्या कारमध्ये डॅश बोर्डावर मोबाइल बसवला नसेल आणि हातात मोबाईल घेऊन गूगल मॅप वापरत असाल तर 5 हजार रुपयांपर्यंतचे दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
अलीकडेच पोलिसांनी दिल्लीत एका व्यक्तीचे चालान कापले. कार चालकाने युक्तिवाद केला की तो कुणाशी बोलत नाही, मग त्याचे चालान का कापले गेले ?. यावर दिल्ली पोलिसांनी सांगितले की, मोबाईल होल्डरच्या वापराविना गुगल मॅप वापरणे वाहतुकीच्या नियमांच्या विरोधात आहे. कारण असे केल्याने वाहन चालविताना लक्ष विचलित होण्याची शक्यता असते. हे प्रकरण निष्काळजीपणाने वाहन चालवण्याच्या प्रकारात मोडते.
तुम्ही वाहन चालवताना गूगल मॅप वापरत असल्यास, यासाठी आपल्या वाहनात मोबाईल होल्डर बसवून घ्या. मोबाइल होल्डरमध्ये फोन ठेवून गुगल मॅप वापरणे नियम कायद्याचे उल्लंघन मानले जात नाही.
मोबाइल होल्डर दुचाकीसाठी 200 रुपयांपर्यंत तर कारमध्ये 1 हजार रुपयांपर्यंत मिळतो. जर तुम्ही वेळीच होल्डर लावून घेतलात तर 1 हजार रुपयांपासून 5 हजार रुपयांपर्यंतचे चलान टाळू शकता.