नवी दिल्ली : कोलकात्यामध्ये डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ डॉक्टरांनी सोमवारी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. सोमवारी १७ जूनला आपत्कालीन वैद्यकीय सेवा वगळता देशभरातील सर्व वैद्यकीय सेवा बंद राहणार असल्याचे संघटनेनं जाहीर केले आहे. भारतीय आरोग्य संघटना अर्थात आएमएने शुक्रवारपासून निषेध आंदोलन सुरू केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रुग्णालयात हिंसाचार करणाऱ्यांना किमान सात वर्षांचा तुरुंगवास देणारा कायदा करावा, अशी मागणीही ‘आयएमए’ने केली आहे. महाराष्ट्रातील जवळपास साडे चार हजार निवासी डॉक्टर आणि पाच हजार इंटर्नशीपचे विद्यार्थी शुक्रवारी सकाळी आठ ते पाच वेळेत पुकारलेल्या काम बंद आंदोलनात सहभागी झाले होते.



पश्चिम बंगालमधील दोन कनिष्ठ डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यानंतर डॉक्टरांच्या सुरू असलेल्या आंदोलनाने आता जोर पकडला आहे. त्याचाच एक भाग म्हणून या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील डॉक्टरांच्या आंदोलनाला देशातील अनेक राज्यांतील डॉक्टरांचेही समर्थन मिळाले आहे. त्यानंतर दिल्ली, मुंबईसह अनेक शहरांमधील आरोग्यसेवांवर त्याचा परिणाम होत आहे. याच हल्ल्याच्या निषेधार्थ पश्चिम बंगालमधील तब्बल 700 डॉक्टरांनी आपले सामूहिक राजीनामे दिले आहेत.



दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माफी मागितल्यानंतरच आपण कामावर रूजू होणार असल्याची अट डॉक्टरांकडून घालण्यात आली आहे. तर दुसरीकडे एम्समधील डॉक्टरांच्या संघटनेनेही ममता बॅनर्जी यांना अल्टीमेटम दिला आहे. दोन दिवसांमध्ये डॉक्टरांच्या मागण्या मान्य न झाल्यास एम्समधील डॉक्टरही अनिश्चित कालावधीसाठी संपावर जातील, असा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला आहे.