इंफोसिसचे सह-संस्थापक नारायमूर्ती यांनी तरुणांना आठवड्याचे 70 तास काम करण्याचा सल्ला दिल्याने वाद पेटला असून सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. देशाच्या प्रगतीसाठी भारतातील तरुणांनी आठवड्याचे 70 तास काम केलं पाहिजे असं मत त्यांनी एका मुलाखतीत मांडलं. यानंतर सर्वसामान्यांसह अनेक उद्योगपतींनी नारायणमूर्ती यांच्या मताशी असहमत असल्याचं सांगत टीका केली आहे. तर जेएसडब्ल्यूचे चेअरमन सज्जन जिंदाल यांच्यासारख्या काहींनी पाठिंबा दर्शवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगळुरू-स्थित हृदयरोगतज्ज्ञ डॉ दीपक कृष्णमूर्ती यांनी खील या मुद्द्यावर भाष्य केलं असून अवास्तव कामाचे तास असणारं वेळापत्रक आणि त्याचे आरोग्यावर होणारे दीर्घकालीन परिणाम उघड केले आहेत. डॉ कृष्णमूर्ती यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी एक नोकरदार दिवसातील किती तास काम करतो यासह इतर गोष्टींसाठी देणारा वेळ याची यादीच दिली आहे. अशा अमानुष कामाच्या तासांमुळे संपूर्ण पिढीमध्ये हृदयाशी निगडीत व्याधी निर्माण होऊ शकतात असं ते म्हणाले आहेत. 


“दिवसाचे 24 तास, जर तुम्ही आठवड्यातून 6 दिवस काम करत असाल तर दिवसाचे 12 तास होतात. यातून मग 12 तास उरतात. त्यातील 8 तास झोपेत जातात. 4 तास राहिले असता बंगळुरूसारख्या शहरात 2 तास रस्त्यावर उरलेल्या 2 तासात ब्रश, टॉयलेट, आंघोळ आणि जेवण. कुटुंब, सोशल लाइफ, व्यायाम यासाठी वेळच नाही. काही कंपन्या तर कामाचे तास संपल्यानंतरही कर्मचाऱ्यांनी ईमेल आणि कॉल्सचं उत्तर द्यावं अशी अपेक्षा करतात. मग तरुणांना हार्ट अटॅक कसा काय येतो याचं आश्चर्य वाटून घ्यायचं?," असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. 



कमेंट सेक्शनमध्ये डॉक्टरने सरकारकडे नोकऱ्यांची संख्या वाढवण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरुन बेरोजगारी नष्ट होईल आणि तरुण काम आणि आयुष्य याचा समतोल साधू शकतील.


डॉ दीपक कृष्णमूर्ती यांची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. काहींनी त्यांच्या मताशी सहमती दर्शवली असून, काहीजण असहमत आहेत. 


"अगदी खरं आहे. कामासाठी आनंदाने 60 ते 70 तास देणारा करिअरमध्ये पुढे जातो असं दाखवण्याचा यांचा प्रयत्न आहे. पण हे अजिबात खरं नाही. तुम्ही फक्त तुमच्या मॅनेरजच्या नजरेत चांगले होता. शेवटी, तुमची प्रतिभा बोलते," असं एका युजरने लिहिलं आहे. "यामुळे हृदयाशी संबंधित समस्या, तणाव संबंधित गुंतागुंत, मानसिक आरोग्याच्या समस्या, घटस्फोट, पालकांच्या समस्या, चिंता आणि असं बरेच काही होऊ शकतं," असं एकाने सांगितलं आहे.


नारायणमूर्ती काय म्हणाले आहेत?


"देशाला प्रगती हवी असेल तर तरुणांनी रोज किमान 12 तास काम करायला हवं, म्हणजेच आठवड्याचे 70 तास. तेव्हाच भारत अशा अर्थव्यवस्थांशी स्पर्धा करु शकेल, ज्या गेल्या दोन ते दशकांपासून प्रचंड यशस्वी आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनी आणि जपानमधील नागरिकांनी हेच केलं होतं," असं नारायणमूर्ती म्हणाले आहेत. त्यांनी पॉडकास्ट 'द रेकॉर्ड' साठी इंफोसिसचे माजी सीएफओ मोहनदास पै यांच्यांशी संवाद साधताना हा सल्ला दिला.