रायपूर: देशातील मोदी नावाच्या प्रत्येक व्यक्तीला चोर ठरवणे, हे काँग्रेसारख्या जुन्याजाणत्या पक्षाला शोभेत का, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला. ते मंगळवारी छत्तीसगढ येथील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून टीका करताना वापरण्यात येणाऱ्या भाषेचा मुद्दा उपस्थित केला. मोदी यांनी म्हटले की, हे लोक आता मर्यादा ओलांडत आहेत. त्यांचा मतानुसार देशातील मोदी आडनावाची प्रत्येक व्यक्ती चोर आहे. हे कोणत्या प्रकारचे राजकारण आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी ते एका संपूर्ण समुदायाला चोर ठरवत असल्याचे मोदी यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी मोदी यांनी काँग्रेस पक्षावरही सडकून टीका केली. काँग्रेस पक्षाला विश्वासघाताचा दीर्घ इतिहास आहे. गेल्या बऱ्याच काळापासून काँग्रेसशी जनमानसाशी असलेली नाळ तुटली आहे. त्यामुळे काँग्रेसला जनभावना आणि लोकांच्या गरजांची समज नाही. केवळ एका घराण्याची चाकरी करणे, हेच काँग्रेस पक्षाचे वास्तव असल्याचे मोदी यांनी सांगितले. 



गेल्या काही काळापासून राहुल गांधी यांनी 'चौकीदार चोर है' ही घोषणा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात रान उठवले आहे. तसेच ललित मोदी, पीएनबी गैरव्यवहारातील आरोपी नीरव मोदी फरार झाल्यामुळेही विरोधक सातत्याने मोदी सरकारला घेरताना दिसतात. त्यामुळे मोदी सरकारची चांगलीच कोंडी होत आहे.