ओरिजिनॅलिटी हरवू देऊ नका, रोहित पवारांचा राज ठाकरे यांना खोचक टोला
राज ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या वादात आता आमदार रोहित पवार यांची उडी
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांमधील शाब्दिक युद्ध दिवसेदिवस वाढतचं चाललं आहे. या प्रकरणात नव्यानेचं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit pawar) यांनी उडी घेतली आहे. आज राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांचा 5 जून रोजी ठरलेला अयोध्या दौऱ्याच्या चर्चेनंतर, आता त्यांचा पुणे दौराही चर्चेत आहे. याच पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांना खोचक टोला लगावला आहे.
ओरिजिनॅलिटी हरवू देऊ नका
'राज ठाकरे हे स्वत: एका पक्षाचे प्रमुख आहेत. त्यामुळे राज्यात कुठेही जाऊन ते त्यांचा पक्ष वाढवू शकतात. त्यांना पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. मात्र दुसऱ्या पक्षाचं ऐकून राज ठाकरे भाषण करत असतील तर त्यांनी स्वत:ची ओरिजिनॅलिटी हरवू देऊ नये. त्यांची ओरिजिनॅलिटी कुठेतरी हरवत चालली आहे. ती त्यांनी जपली पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं', असा खोचक सल्ला यावेळी रोहित पवार यांनी दिला आहे.
उद्धव ठाकरे यांचं समर्थन
आमदार रोहित पवार यांनी शनिवारी झालेल्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेचे समर्थन केले आहे. उद्धव ठाकरे स्वत: राज ठाकरे यांचे बंधू आहेत. आमच्यापेक्षा ते जास्त त्यांच्या जवळचे राहिले आहेत. त्यांच्याबद्दल त्यांनाच जास्त गोष्टी माहिती असाव्यात. त्यामुळेच त्यांनी ते विधान केलं असावं, ते त्यांच व्यक्तिगत विधान आहे, असंही रोहित पवार म्हणाले.
संभाजीराजे यांना समर्थन दिलं पाहिजे
राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी अपक्ष राहण्याचा निर्णय घेतला आहे. काल नांदेड येथे बोलतांना शरद पवार यांनी त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यावर रोहित पवार म्हणाले की, माझी वैयक्तिक भूमिका सांगायची झाली तर, मला असं वाटते की त्यांना समर्थन दिल पाहिजे.
भाजपकडून राज्यसभेवर खासदार असताना संभाजीराजे यांना मराठा आरक्षणाचा विषय पार्लमेंटमध्ये मांडायचा होता. तेव्हा स्पीकरने त्यांना बोलायला एक मिनिटही दिला नव्हता. त्यावेळी संजय राऊत यांनी भांडून पाच-सात मिनिटे बोलण्याची संधी दिली होती.