मला कॅन्सर आहे, आई - वडिलांना सांगू नका; चिमुकल्याचे शब्द ऐकून डॉक्टरांचे डोळे आले भरुन
मोठ्यांकडून मुलं अनेकदा काहीतरी मागतात, पण त्यांना नकार देणं खूप अवघड होऊन बसतं. मात्र एका निरागस मुलाने हैद्राबादच्या डॉक्टरकडे असे वचन मागितले की त्यांचे डोळे भरून आले. डॉक्टरांनी ट्वीट करत या मुलाची गोष्ट सर्व जगासमोर आणली आहे
Heart touching story : आजकल मुलं आपल्या आई वडिलांकडे लक्ष देत नाही अशी काहीशी ओरड ऐकायला मिळते. आपल्या मुलांना आपली काळजीच नाही असेही त्यांचे पालक सातत्याने म्हणताना दिसतात. मात्र हैदराबाद (hyderabad) येथील एक प्रसंग वाचून तुमच्या अंगावर नक्कीच काटा येईल. सहा वर्षाच्या कॅन्सरग्रस्त (cancer) मुलाच्या कृत्याने डॉक्टरही भावूक झाले आहेत. हैदराबादमध्ये एका 6 वर्षाच्या निष्पाप मुलाने मला कॅन्सर झाला आहे हे माझ्या आई-वडिलांना सांगू नका, डॉक्टरांना सांगितले. यानंतर डॉक्टरांनाही आपल्या भावना रोखता आल्या नाहीत. महत्त्वाची बाब म्हणजे या मुलाच्या आई वडिलांना त्याच्या या आजाराबद्दल माहिती होती. मात्र त्यांनीही डॉक्टरांना मुलाला काहीही सांगू नका अशी विनंती केली होती.
हैदराबादच्या अपोलो हॉस्पिटलमधील न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर गुप्ता यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही डोळ्यात पाणी आणणारी गोष्ट जगासोबत आणली आहे. एवढ्याश्या लहान मुलाकडून एवढी मोठी आणि गंभीर गोष्ट सहजपणे ऐकून आश्चर्य वाटल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.
"मला ६ वर्षाच्या मनूने सांगितले, डॉक्टर, मला ग्रेड 4चा कॅन्सर आहे आणि मी फक्त 6 महिनेच जगेन. माझ्या आई-वडिलांना याबद्दल सांगू नका. मी इंटरनेटवर या आजाराबद्दल ऐकले होते पण मी माझ्या पालकांना हे सांगितले नाही कारण ते माझ्यामुळे नाराज होतील. ते दोघे माझ्यावर खूप प्रेम करतात, प्लीज त्यांना काही बोलू नका," असे डॉ. सुधीर गुप्ता यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
"एक तरुण जोडपे ओपीडीमध्ये आले होते आणि त्यांनी मला सांगितले की त्यांचा मुलगा मनूला कर्करोग आहे. तो बाहेर वाट पाहत आहे. ते म्हणाले की, मुलाला कॅन्सर आहे कळायला नको अशी आमची इच्छा आहे. या जोडप्याने मला मुलावर उपचार करण्यास सांगितले. मी मनूला भेटलो. तो व्हील चेअरवर होता. त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले. मग मी मनूचा वैद्यकीय अहवाल पाहिला आणि त्याच्या पालकांशी बोललो. तेव्हा मुलाने माझ्याशी एकट्याने बोलण्याची विनंती केली," असं डॉ. सुधीर गुप्ता यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.