महिला पत्रकारांना शबरीमाला मंदिरांकडे पाठवू नका; हिंदू संघटनांचा इशारा
केरळमधील वातावरण प्रचंड तापले आहे.
नवी दिल्ली: केरळच्या शबरीमाला मंदिरात सोमवारपासून सुरु होणाऱ्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदू संघटना प्रचंड आक्रमक झाल्या आहेत. या उत्सवाच्यावेळी मासिक पाळी असणाऱ्या महिलांना मंदिरात जाण्यापासून हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार विरोध होण्याची दाट शक्यता आहे. त्यादृष्टीने केरळमधील डाव्या सरकारने याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
या पार्श्वभूमीवर हिंदू संघटनांनी वृत्तसंस्थांना महिला पत्रकारांना याठिकाणी वृत्तांकनासाठी न पाठवण्याचा इशारा दिला आहे. या मुद्द्यावर समर्थन किंवा विरोध करण्याचा तुमचा हक्क आम्हाला मान्य आहे. मात्र, येथील परिस्थिती चिघळेल, असे काहीही तुम्ही करणार नाही, ही आशा आम्ही करत असल्याचे हिंदू संघटनांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने सर्व वयोगटाच्या महिलांना शबरीमाला मंदिराची दारे उघडी केल्यानंतरही येथील संघर्ष कायम आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर हे मंदिर १७ ते २२ ऑक्टोबर या कालावधीत पहिल्यांदाच उघडण्यात आले होते. मात्र, न्यायालयाच्या निर्णयाला विरोध असणाऱ्या भक्तांनी एकाही महिलेला मंदिरात शिरून दिले नव्हते. तसेच महिला पत्रकारांवरही हल्ला करण्यात आला होता.
या घटनाक्रमानंतर केरळमधील राजकारण प्रचंड तापले आहे. उद्यापासून या मंदिराचे दरवाजे पुन्हा उघडतील. त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.