ओडिशा : शिक्षण हे नेहमीच माणसाला अधिकाधिक समृद्ध बनवते. त्यामुळे शिक्षणासाठी अमूक एक वय किंवा पात्रतेच्याच मर्यादा असतात असं नाही. मुळात अखेरच्या श्वासपर्यंत माणूस शिकतच असतो. हीच बाब हेरत आणि शिक्षणाप्रती असणारी ओढ जाणत ८० वर्षांच्या एका राजकीय व्यक्तीमत्त्वाने थेट महाविद्यालयाची पायरी चढली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओडिशा येथील  नारायण साहू असं त्यांचं नाव असून, त्यांनी स्थानिक विद्यापीठातून पीएचडीसाठीच्या शिक्षणास सुरुवात केली आहे. ज्याकरता त्यांनी राजकारण्याच्या वाटा दूर सारल्या आहेत. खासदारकी आणि आमदारकी भूषवणाऱ्या साहू यांनी उत्कल विद्यापीठात प्रवेश केला असून, इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच तेसुद्धा आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करत आहेत. 


विद्यापीठाच्याच हॉस्टेलमध्ये मच्छरदाणी असणारा एक लहान पलंग, पुस्तकांनी भरलेलं टेबल, कुटुंबीयांच्या आठवणी जागवणारे फोटो अशा वस्तू असणाऱ्या एका लहानशा खोलीत राहतात. 


पल्ल्हारा या भागातून दोन वेळेस खासदार म्हणून निवडून आलेल्या साहू यांनी शिक्षणासाठी राजकारणाला रामराम ठोकला आहे. राजकारणाची तत्त्व बदलत असून, आता या गोष्टींमध्ये राम उरलेला नसल्याचं म्हणत त्यांनी या क्षेत्रातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला. 


'सुरुवातीला मला राजकारणात फार रस होता. पण, हळूहळू मी राजकारणाची चुकीची बाजू पाहिली आणि या गोष्टींमुळे माझा भ्रमनिरास झाला. मी राजकारणाचा त्याग केला आणि माझं आयुष्य एक विद्यार्थी म्हणून व्यतीत करण्याचा निर्णय घेतला. विद्यापीठात प्रवेश मिळणं हा माझ्या आयुष्यातील सर्वाधिक आनंदाचा दिवस आहे' असं ते एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना म्हणाले. 



'एएनआय'च्या वृत्तानुसार, १९६३ मध्ये साहू यांनी Ravenshaw University  येथून अर्थशास्त्रातील पदवी शिक्षण पूर्ण केलं होतं. शिक्षणाप्रती असणारी ओढ त्यांना जवळपास ४६ वर्षांनंतर पुन्हा या वाटेवर घेऊन आली. २००९ मध्ये त्यांनी उत्कल विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेण्यास प्रवेश मिळवला आणि २०११ मध्ये त्यांनी हे शिक्षण पूर्ण केलं. शिक्षणाप्रती असणारी ओढ आणि चिकाटी पाहता विद्यापीठ प्रशासनालाही त्यांच्या या वरिष्ठ विद्यार्थ्याचा प्रचंड अभिमान वाटतो आहे.