Droupadi Murmu Missed Most IMP Call: सतत मोबाईलवर असणारे आणि गरज पडेल तेव्हाच मोबाईल वापरणारे असे 2 प्रकारचे लोक असतात असं म्हटलं जातं. भारताच्या प्रथम नागरिक असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) या मोबाईल कमी प्रमाणात वापरणाऱ्यांपैकी आहेत. मात्र मोबाईलचा फारसा वापर न करण्याच्या याच सवयीमुळे द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा कॉल मिस केला होता. हा कॉल त्यांना पंतप्रधानांच्या कार्यालयामधून करण्यात आला होता. एनडीएकडून राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी तुम्हाला उमेदवारी देत असल्याचं या कॉलवरुन त्यांना कळवण्यात येणार होतं. मात्र त्यांनी तो कॉल उचललाच नाही. हा दावा एका नव्या पुस्तकात करण्यात आला आहे.


तो अधिकारी धावत घरी आला अन्...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

द्रौपदी मुर्मू यांनी कॉल मिस केल्यानंतर थोड्याच वेळात बिकाश चंद्र मोहंतो फोन घेऊन धावत धावत मूर्मू यांच्या घरी आले आणि त्यांनी तुमच्यासाठी माझ्या मोबाईलवर पंतप्रधान कार्यालयाकडून फोन आल्याचं सांगितलं. तुम्हाला पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क करण्यास सांगितलं आहे असंही मोहंतो यांनी सांगितलं. मोहंतो हे झारखंडमध्ये मुर्मू यांच्या कार्यालयामध्ये ओएसडी म्हणजेच विशेष सेवा अधिकारी म्हणून कार्यरत होते.


कुठे करण्यात आलाय हा खुलासा?


'द्रौपदी मुर्मू : फ्रॉम ट्रायबल हिंटरलॅण्ड टू रायसीना हिल' या नावाचं पुस्तक नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे. पत्रकार कस्तुरी रे यांनी लिहिलेल्या रुपा प्रकाशनाच्या या पुस्तकामध्ये 21 जून 2022 च्या या घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे. एक शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता, खासदार, मंत्री, झारखंडच्या राज्यपाल ते भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती हा मुर्मू यांचा प्रवास कस्तुरी रे यांनी या पुस्तकातून मांडला आहे. मागील वर्षी जून महिन्यात मुर्मू या राजधानी भुवनेश्वरपासून 275 किमी दूर आणि आपल्या वडिलांच्या गावी उपारबेडा गावापासून 14 किलोमीटरवर रायरंगपूरमध्ये होत्या. भाजपाकडून एनडीएचा राष्ट्रपती पदाचा उमेदवार कोण असेल याची घोषणा केली जाणार होती. सर्व देश भाजपाकडून कोणाला उमेदवारी दिली जाईल यासंदर्भातील घोषणेची वाट पाहत होता.


सर्वात महत्त्वाच्या कॉलपैकी एक


"दुर्देवाने वीज नसल्याने मुर्मू आणि त्यांचे कुटुंबीय या घोषणेसंदर्भातील बातम्या पाहू शकले नाहीत. मात्र संकेत त्यांच्याच नावाची घोषणा होणार असेच होते," असं पुस्तकात म्हटलं आहे. पुस्तकातील दाव्यानुसार, "लोकांनी मुर्मू यांच्या घराजवळ गर्दी करण्यास सुरुवात केली. मुर्मू यांनी या लोकांना घरात बोलवून त्यांच्याशी चर्चा केली. त्या मोबाईल फोनचा फार वापर करायच्या नाहीत. त्यामुळे त्यांचा फोनही त्यांच्याकडे नव्हता. त्यामुळेच कदाचि त्यांनी यासंदर्भातील कॉल मिस केला होता. त्यानंतर हाच कॉल त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या कॉलपैकी एक ठरला."


दुकान बंद करुन घर गाठलं


"कोणाच्या नावाची घोषणा होईल याबद्दल संभ्रम असतानाच त्यांचे विशेष सेवा अधिकारी आणि रायरंगपूर मेडिकल स्टोअर चालवणारे बिकाश चंद्र मोहंतो फोन हातात घेऊन धावत मुर्मू यांच्या घरी आले. मोहंतो यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन आला होता. त्यांना मुर्मू यांच्याशी बोलवं असं सांगण्यात आलं. फोन कॉल नंतर मोहंतो यांनी आपलं दुकान बंद करुन थेट मुर्मू यांचं घर गाठलं," असं पुस्तकात सांगण्यात आलं आहे. 


मोदींनी दिला विश्वास


"मोहंतो घरी येईपर्यंत मुर्मू यांना आपण आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा कॉल मीस केल्याची जाणीव नव्हती. मोहंतो यांनी त्यांचा फोन मुर्मू यांना दिला. त्यावेळी समोरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते," असा उल्लेख पुस्तकात आहे. "राष्ट्रपती पदासाठी आपण एनडीएचे उमेदवार म्हणून पहिल्याला पहिली पसंती आहे याची जाणीव त्यांना होती. मुर्मू यांच्याकडे बोलण्यासाठी काही शब्दच नव्हते. मी अपेक्षेनुसार कामगिरी करुन जबाबदारी स्वीकारु शकेल का असं मुर्मू यांनी विचारलं असता मोदींनी त्यांना तुम्ही हे करु शकता असं सांगितलं," असंही पुस्तकात म्हटलं आहे.