नवी दिल्ली: एखाद्या व्यवस्थेवर टीका करणे, हल्ला करणे किंवा ती उद्ध्वस्त करणे सोपे असते. मात्र, तीच व्यवस्था चालवणे अवघड काम असते, असे मत सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी मांडले. ते बुधवारी सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनने आयोजित केलेल्या ध्वजारोहण समारंभात बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयातील चार वरिष्ठ न्यायालयांनी सरन्यायाधीशांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत बंड पुकारले होते. या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीश मिश्रा यांचे विधान सूचक मानले जात आहे. 


एखाद्या संस्थेला नव्या उंचीवर नेण्यासाठी लोकांनी वैयक्तिक महत्त्वकांक्षा आणि मतभिन्नता बाजूला सारुन सुधारणांसाठी सकारात्मक विचारसरणीने काम करत राहणे गरजेचे आहे. तसेच प्रतिकूल परिस्थितीतही आपण काम करत राहणे आवश्यक आहे. काही घटक संस्थेला दुबळे करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आपण त्याला नकार देत एकत्रितपणे असे प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत, असे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी सांगितले.