नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ एप्रिल रोजी वर्धा येथे केलेल्या भाषणात आचारसंहितेचे कोणतेही उल्लंघन झालेले नाही, असे मंगळवारी निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले. नरेंद्र मोदींच्यावर्धा येथील भाषणाची तपासणी केली असता, त्यामध्ये काहीही आक्षेपार्ह किंवा आचारसंहितेचा भंग करणारी गोष्ट आढळली नाही, असेही आयोगाने सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने मोदींच्या भाषणासंदर्भात हा निर्णय दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्धा येथे १ एप्रिल रोजी झालेल्या सभेत नरेंद्र मोदी यांनी नवमतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. पुलवामातील शहीद जवानांना स्मरून मतदान करा, असे मोदींनी यावेळी म्हटले होते. काँग्रेसने याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली होती.


याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली. यानंतर काही वेळातच आयोगाकडून नरेंद्र मोदी यांना क्लीन चीट देण्यात आली. 



याशिवाय, भाजपाध्यक्ष अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही प्रचारादरम्यान भारतीय लष्कराचा उल्लेख 'मोदी की सेना' असा केला होता. या प्रकरणीही काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे दाद मागण्यात आली आहे.