नवी दिल्ली : ईडीने शनिवारी दिल्ली, गुरुग्राम, मुंबई आणि पुण्यात 15 ठिकाणी छापे टाकले असून चीनी कंपन्यांच्या 1268 कोटीच्या मोठ्या ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटचा खुलासा केला आहे. ईडीने कारवाई करत HSBC बँकेच्या 4 खात्यांमध्ये जमा 46.96 कोटी रुपये जप्त केले आहेत. त्याशिवाय ईडीने 5 लॅपटॉप, 17 हार्ड डिस्क, फोन आणि महत्त्वाचे कागदपत्रही जप्त केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हैदराबादमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर ईडीने ही छापेमारी केली आहे. हैदराबाद सायबर पोलिसांनी Dokypay Technology Private Ltd आणि Linkyun Technology Pvt Ltd विरुद्ध गुन्हा दाखल करुन चीनच्या नागरिकांसह इतर तिघांना अटक केली आहे.


हैदराबाद प्रकरणाच्या तपासात, चीनी कंपन्या भारतात सट्टेबाजीचं मोठं नेटवर्क चालवत असल्याचं समोर आलं आहे. चीनी नागरिक चीनमध्ये राहूनच भारतात सीएच्या मदतीने नवीन कंपन्या सुरु करुन त्यात भारतीयांना डमी डायरेक्टर बनवत होते. या लोकांद्वारे भारतात  HSBC बँकमध्ये खातं सुरु करण्यात आलं होतं.


त्यानंतर काही दिवसांनी चीनी नागरिक भारतात येऊन कंपन्यांची डायरेक्टरशीप घेऊन, बँकेत सुरु करण्यात आलेल्या खात्याचा ऑनलाईन वापर करण्यासाठी यूजर आयडी, पासवर्ड चीनमध्ये पाठवून पैशाचा व्यवहार करत. बँक खात्यांसह, व्यवहारासाठी Paytm, Cashfree, Razorpay वॉलेट अकाऊंटही सुरु केले होते.


चीनी कंपन्यांनी सट्टेबाजीसाठी एक वेबसाईट बनवली होती. या वेबसाईटच्या माध्यमातून भारतातील लोकांना सट्टेबाजीत फसवलं जात होतं आणि त्यानंतर ऍपद्वारे सट्टेबाजी केली जात होती. या चीनी लोकांनी आपले एजंट तयार केले होते, जे सट्टेबाजीसाठी लोकांना तयार करायचे. 


ईडीने केलेल्या छापेमारीमध्ये काही महत्त्वाच्या कागदपत्रांद्वारे, Dokypay Technology Pvt Ltd ने गेल्या वर्षी 1268 कोटी सट्टेबाजीतून कमावले. त्यापैकी 300 कोटी Paytmमधून आले. तर 600 कोटी Paytmमधून पाठवले गेले. Linkyun Technology द्वारे 120 कोटींचा व्यवहार झाला. भारतातील ऑनलाईन चायनीज डेटिंग ऍप्सद्वारेही पैशांचा व्यवहार समोर आला आहे.