ED Seizes 2 Crore 54 Lakhs: विदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा म्हणजेच 'फेमा'अंतर्गत सक्तवसुली संचलनालयने देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये छापेमारी केली. या छापेमारीदरम्यान केंद्रीय तपास यंत्रणेनं कोट्यवधी रुपयांची कॅश जप्त केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ईडीच्या अधिकाऱ्यांना छापेमारी केलेल्या एका ठिकाणी चक्क फ्रण्ट लोड वॉशिंग मशीनमध्ये लपवलेल्या नोटा सापडल्या. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, सदर छापेमारीनंतर 47 बँक खात्यांच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांवर बंदी घालण्यात आली आहे. 


ईडीने दिली माहिती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईडीने जारी केलेल्या पत्रकानुसार कॅपरीकोरनियान शिपिंग अॅण्ड लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड सारख्या कंपन्या आणि या कंपनी संचाकल विजय कुमार शुक्ला आणि संजय गोस्वामी यांच्या मालकीच्या कंपन्यांच्या परिसरामध्ये छापेमारी करण्यात आली. मात्र ही छापेमारी नक्की कधी केली यासंदर्भातील माहिती ईडीने जारी केलेली नाही. दिल्ली, मुंबई, हैदराबाद, कोलकात्यामधील वेगवेगळ्या ठिकाणांवर ईडीकडून एकाचवेळी छापेमारी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. 


कोणत्या कंपन्यांवर पडले छापे?


विजय कुमार शुक्ला आणि संजय गोस्वामी यांच्या मालकीच्या ज्या कंपन्यांच्या परिसरात छापेमारी करण्यात आली त्यामध्ये लक्ष्मीटन मॅरीटाइम, हिंदुस्तान इंटरनॅशनल, राजनंदिनी मेटल्स लिमिटेड, स्टवार्ट अलॉइज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, भाग्यनगर लिमिटेड, विनायक स्टील्स लिमिटेड, वशिष्ठ कंस्ट्रकर्शन प्रायव्हेट लिमिटेड आणि संचालक तसेच गुंतवणूकदार संदीप गर्ग, विनोद केडिया यांच्या मालकीच्या संपत्तीवर छापे टाकण्यात आले.


वॉशिंग मशीनमध्ये 500 रुपयांच्या नोटांचे बंडल


या छापेमारीदरम्यान एका ठिकाणी चक्क वॉशिंग मशिनमध्ये नोटा लपवल्याचं आढळून आल्याचं ईडीने स्पष्ट केलं आहे. मात्र पैशांनी भरलेली ही मशिन नमकी कुठे सापडली याचा खुलासा ईडीने केलेली नाही. तपासामध्ये एकूण 2.54 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता सापडली. त्यापैकी मोठा हिस्सा हा एका वॉशिंग मशिनमध्ये लपवून ठेवला होता. या फ्रण्ट लोड मशीनचे दार उघडताच आतमध्ये 500 रुपयांच्या नोटांचे बंडल पाहून अधिकाऱ्यांनाही धक्काच बसला. 


1800 कोटी रुपये सिंगापूरला पाठवले


ईडीला 'खात्रीलायक सूत्रांकडून' माहिती मिळाही होती की या कंपन्या भारताबाहेर मोठ्याप्रमाणात परदेशी चलन पुरवठा करण्याच्या व्यवहारांमध्ये सहभागी आहेत. या कंपन्यांनी सिंगापूरच्या गॅलेक्सी शिपिंग अॅण्ड लॉजिस्टिक्स तसेच होरायझन शिपिंग अॅण्ड लॉजिस्टिक्सला 1800 कोटी रुपये पाठवल्याचं ईडीने म्हटलं आहे. या दोन्ही कंपन्यांना संभाळण्याची जबाबदारी अँथनी डि-सिल्वाकडे आहे. अशाप्रकारे अनधिकृतरित्या परकीय चलनामध्ये व्यवहार करणाऱ्यांविरुद्ध 'फेमा' कायद्याअंतर्गत कारवाई केली जाते. अशी कारवाई एखादी व्यक्ती किंवा थेट कंपनीविरोधातही केली जाते.