नवी दिल्ली : भारतातील विविध बँकांना ९००० कोटी रुपयांचा गंडा घालणारा विजय माल्ल्या सध्या लंडनमध्ये आहे. विजय माल्ल्या लंडनमध्ये तिसरं लग्न करणार असल्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये लग्नाच्या बातम्या येत असतानाच आता माल्ल्याच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजय माल्ल्यावर बँकांचे जवळपास ९००० कोटी रुपयांचं कर्ज थकीत आहे. हे कर्ज वसुल करण्यासाठी 'ईडी' म्हणजेच अंमलबजावणी संचलनालयानं प्रक्रिया सुरु केली आहे. ईडीची ही कारवाई क्रिमिनल प्रोसिजर कोड सेक्शन ८३ अंतर्गत करण्यात येत आहे. 


काय आहे ईडीचा आरोप 


ईडीने न्यायालयात विजय माल्ल्या विरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटलं आहे की, माल्ल्याने १९९६, १९९७ आणि १९९८ मध्ये लंडनमध्ये झालेल्या फॉर्म्युला वन रेसिंग दरम्यान ब्रिटिश फर्मला जवळपास १ कोटी २९ लाख रुपये दिले होते.


विजय माल्ल्याने हा पैसा आपली कंपनी किंगफिशरमधील कर्मचाऱ्यांना युरोप फिरवण्यासाठी दिले होते. हा पैसा आरभीआयकडून परवानगी न घेता देण्यात आल्याचा आरोप आहे. हा प्रकार म्हणजे फॉरेन एक्सचेंज रेग्युलेटरी अथॉरिटीचं उल्लंघन मानलं जातं.


विजय माल्ल्या विरोधात लंडनमध्ये कारवाई 


भारतीय बँकांकडून ९००० कोटी रुपयांचं कर्ज घेवून परदेशात पसार झालेल्या विजय माल्ल्या विरोधात विजय मल्ल्याच्या विरोधात गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत खटला सुरु आहे. मुंबईतील स्पेशल कोर्टाने विजय माल्ल्याला फरार घोषित केलं आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये भारत सरकारने युके सरकारकडे विजय माल्ल्याला समर्पण करण्याची मागणी केली होती. 


विजय माल्ल्यावर किती कर्ज?


विजय माल्ल्याच्या किंगफिशर एअरलाईन्सवर १७ बँकांचं ६९६३ कोटी रुपयांचं कर्ज आहे. एकूण व्याज मिळून या कर्जाची रक्कम ९४०० कोटी रुपयांहून अधिक होते. असाही आरोप करण्यात येत आहे की, किंगफिशर एअरलाईन्सने IDBI कडून मिळालेल्या ९०० कोटी रुपयांपैकी २५४ कोटी रुपये माल्ल्या खासगी कामासाठी वापरले. किंगफिशर एअरलाईन्स २०१२ मध्ये बंद करण्यात आली आणि २०१४ मध्ये फ्लाईंग परमिट ही रद्द करण्यात आलं.


कुठल्या बँकेचं किती कर्ज?


  • एसबीआय : १६०० कोटी


  • पंजाब नॅशनल बँक : ८०० कोटी


  • आयडीबीआय बँक : ८०० कोटी


  • बँक ऑफ इंडिया : ६५० कोटी


  • बँक ऑफ बडोदा : ५५० कोटी


  • युनायटेड बँक ऑफ इंडिया : ४५० कोटी 


कुणासोबत होणार माल्ल्याचं लग्न


पिंकी ललवानीसोबत विजय माल्ल्याचं लग्न होणार आहे. पिंकी ललवानी आणि विजय माल्ल्या २ मार्च २०१६ साली भारतातून लंडनला फरार झाले होते. इकोनॉमिक टाईम्सनं दिलेल्या माहितीनुसार या दोघांनी इंग्लंडमधली त्यांची तिसरी अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट केली.