प्रवाशांनी भरलेली बस थेट ट्रकमध्ये जाऊन घुसली; अंगावर काटा आणणारा अपघात, काचा फोडून काढलं बाहेर
Kannauj Road Accident: आग्रा-लखनऊ महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. स्लीपर बस थेट ट्रकमध्ये जाऊन घुसली. बसमध्ये एकूण 40 प्रवासी प्रवास करत होते.
Kannauj Road Accident: उत्तर प्रदेशातील कनौज येथे आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस-वेवर भीषण रस्ते अपघात झाला आहे. एक्स्प्रेस वे-वर स्लीपर बस एका ट्रकमध्ये जाऊन घुसली आणि हा भीषण अपघात झाला. या अपघातात 8 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, डझनभर प्रवासी जखमी झाले आहेत. बसमध्ये एकूण 40 प्रवासी प्रवास करत होते. घटनास्थळी दाखल झालेल्या जिल्हा दंडाधिकारी आणी पोलीस अधीक्षकांनी परिस्थितीचा आढावा घेतला. सध्या बचावकार्य सुरु आहे. तसंच रस्ता वाहतुकीसाठी रिकामा करण्यात आला आहे.
शुक्रवारी दुपारी कन्नौज जिल्ह्याच्या सकरावा पोलीस ठाणे क्षेत्राच्या आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस 141 वर औरैया बॉर्डरजवळ हा अपघात झाला. अपघात झाल्यानंत तेथून जाणारे उत्तर प्रदेशचे जलशक्ती मंत्री स्वतंत्र देव सिंह जखमींच्या मदतीसाठी थांबले होते. त्यांना जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याचा आदेश दिला. सध्या जखमींना सैफई मेडिकल कॉलेजात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बस वेगात असतानाच नियंत्रण सुटलं आणि समोर उभ्या ट्रकला जाऊन धडकली. धडकेनंतर बस पलटी झाली. अपघातानंतर प्रवाशांची आरडाओरड सुरु झआली होती. यानंतर आसपास उपस्थित लोकांनी काचा तोडून प्रवाशांना बाहेर काढलं. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. अपघात इतका भीषण होता की, बचावकार्यासाठी अनेक तास लागले.
कन्नौजचे पोलीस अधीक्षक अमित कुमार आनंद यांनी सांगितलं की, एक्स्प्रेस-वेवर स्लीपर बस अपघातातील मृतांची संख्या 6 वरुन 8 वर पोहोचली आहे. जखमींची संख्या 19 आहे. सध्या बचावकार्य पूर्ण झालं आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांच्या कुटुंबीयांनाही माहिती देण्यात आली आहे.