MP, राजस्थानसहीत 5 राज्यांच्या निवडणुकांची इलेक्शन कमिशनकडून घोषणा; पाहा संपूर्ण वेळापत्रक
केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यामुळे मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममध्ये निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे.
Assembly Election : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) आज राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. आयोगाने दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. सोमवारी जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार मध्य प्रदेशमध्ये 7 नोव्हेंबरला, राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबरला, छत्तीसगडमध्ये 7 आणि 17 नोव्हेंबरला, तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला आणि मिझोराममध्ये 7 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. 3 डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याचे आयोगाने सांगितले.
मध्यप्रदेश, राजस्थान, मिझोराम आणि तेलंगणामध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. तर छत्तीसगडमधील निवडणुका दोन टप्प्यात पार पडतील. सर्व राज्यांतील सरकारांचा कार्यकाळ डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 दरम्यान संपत आहे. मध्यप्रदेशातील 230 जागांवर निवडणूक होणार आहे. तर राजस्थानमध्ये 200, तेलंगणात 119, छत्तीसगडमध्ये 90 आणि मिझोराममध्ये 40 जागांवर निवडणूक होणार आहे.
वृद्धांना घरातून करता येणार मतदान
मतदान पार पडणाऱ्या या पाच राज्यांमध्ये 60.2 लाख नवीन मतदारांची भर पडल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 8.2 कोटी आणि महिला मतदारांची संख्या 7.8 कोटी आहे. सर्व राज्यांसह विधानसभेच्या एकूण जागांची संख्या 679 आहे. पाच राज्यांमध्ये 1.77 लाख मतदान केंद्रे असतील. 17 ऑक्टोबर रोजी मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल, असेही निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. वृद्ध मतदारांना घरबसल्या मतदान करण्याची सुविधा मिळणार आहे. मात्र, यासाठी त्यांना एक फॉर्म भरावा लागणार आहे.
कोणत्या राज्यात मतदान कधी होणार?
मिझोराम – 7 नोव्हेंबर (एका टप्प्यात)
छत्तीसगड – 7 आणि 17 नोव्हेंबर (दोन टप्प्यात)
मध्य प्रदेश – 17 नोव्हेंबर (एका टप्प्यात)
राजस्थान- 23 नोव्हेंबर (एका टप्प्यात)
तेलंगणा – 30 नोव्हेंबर (एका टप्प्यात)
कोणत्या राज्यात किती जागा?
तेलंगणा - 119 जागा
राजस्थान - 200 जागा
मध्य प्रदेश – 230 जागा
मिझोराम - 40 जागा
छत्तीसगड – 90 जागा