भोपाळ : लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये भोपाळहून दहशतवादाच्या आरोपी आणि भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा ठाकूरच्या उमेदवारीवर बंदी आणण्यास निवडणूक आयोगानं नकार दिलाय. मालेगाव स्फोट प्रकरणातील आरोपी प्रज्ञा ठाकूर विरोधात काँग्रेस समर्थक तहसीन पूनावाला यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. प्रज्ञा सिंह ठाकूर हिच्याविरुद्ध दहशतवादासारख्या गंभीर गुन्ह्यांचं प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी दलानं (एटीएस) २००८ साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर 'मुख्य षडयंत्रकर्ती' असल्याचं सांगत गुन्हा दाखल केला होता. मालेगाव बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे प्रज्ञा ठाकूर हिला निवडणूक लढवण्याची परवानगी दिली जाऊ नये, अशी मागणी पूनावाला यांनी निवडणूक आयोगासमोर केली होती. परंतु, कायदेशीररित्या साध्वी प्रज्ञा हिला निवडणूक लढवण्याची बंदी घालण्यासाठी निवडणूक आयोगानं असमर्थता दर्शवलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साध्वी प्रज्ञा ही केवळ एक आरोपी आहे. तिच्याविरुद्ध कोणतेही गुन्हे आत्तापर्यंत सिद्ध झालेले नाहीत... आणि दोष सिद्ध झाला नसेल तर निवडणूक लढता येऊ शकते. त्यामुळेच साध्वी प्रज्ञा यांना भाजपाकडून उमेदवारी दिली गेल्याचं सांगण्यात येतंय.


'हेमंत करकरेला कर्माची शिक्षा मिळाली'


भोपाळमधून निवडणूक लढवत असलेल्या प्रज्ञा गुरूवारी पहिल्यांदा मीडियासमोर आली. यावेळी, २६/११ च्या हल्ल्यातील शहीद एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल प्रज्ञा हिनं वादग्रस्त वक्तव्य केलं. 'हेमंत करकरेला आपल्या कर्माची शिक्षा मिळालीय. मला त्यांनी चुकीच्या पद्धतीनं या प्रकरणात गुंतवलं होतं. कोणत्याही प्रकारे मला दहशतवादी घोषित करण्याचा त्यांचा डाव होता' असं म्हणत साध्वी प्रज्ञा हिनं हेमंत करकरेंना यांना देषद्रोही ठरवलं.


हेमंत करकरेंबद्दल बोलताना, 'मी कुठुनही पुरावे मिळवील पण कोणत्याही परिस्थितीत साध्वी प्रज्ञाला सोडणार नाही असे हेमंत करकरेंनी म्हटलं होतं. तेव्हा तुझा सर्वनाश होईल असा शाप मी करकरेंना दिला होता... ज्या दिवशी करकरेंना दहशतवाद्यांनी मारले तेव्हा माझं सुतक संपलं' असं वादग्रस्त वक्तव्य साध्वी प्रज्ञा हिनं माध्यमांसमोर केलंय. शहीद हेमंत करकरे यांनाना भारत सरकारकडून मरणोत्तर अशोक चक्र देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.



छातीचा कर्करोग आणि साध्वी प्रज्ञाला जामीन


प्रज्ञा ठाकूर नऊ वर्षांपर्यंत तुरुंगात होती. तिच्यावरील 'मकोका'चे आरोप हटवण्यात आले असले तरी या प्रकरणाशी निगडीत खटला अद्यापही मुंबई हायकोर्टाच्या विचाराधीन आहे. 


धक्कादायक म्हणजे, २०१७ मध्ये साध्वी प्रज्ञा हिला 'छातीचा कर्करोग' असल्याचं आणि तिला साध चालता येणंही शक्य नसल्याचं उच्च न्यायालयासमोर सांगण्यात आलं. त्यामुळे उच्च न्यायालयाकडून तिला जामीन मंजूर करण्यात आला. 


मुंबई हायकोर्टाच्या जामीन निर्णयानुसार, आरोपीला दिलेल्या मेडिकल सर्टिफिकेटमध्ये ती ब्रेस्ट कॅन्सरनं पीडित आणि कोणत्याही आधाराशिवाय चालण्यास असमर्थ असल्याचं म्हटलं गेलंय. योग्य उपचार मिळण्यासाठी ५ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर साध्वी प्रज्ञा हिला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला होता. 



यावरच, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही निशाणा साधलाय. छातीच्या कर्करोगामुळे चालता येणंही अशक्य असल्यानं जमानत मिळालेली साध्वी प्रज्ञा आता निवडणूक कशी लढतेय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.