नवी दिल्ली : मतदानातील गडबड रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने मोठे पाऊल उचलले आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने कायदे मंत्रालयाला एक पत्र लिहिले आहे. मतदार ओळखपत्रांना आधारशी जोडण्याबाबत हे पत्र आहे. त्यामुळे भविष्यात आता आधार कार्डला मतदार ओळखपत्र जोडावे लागण्याची शक्यता आहे. याआधी आधार कार्डला पॅन कार्ड जोडण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मतदार ओळखपत्र आधार कार्डला जोडण्यात यावे, अशी मागणी निवडणूक आयोगाने केंद्रीय कायदे मंत्रालयाला पत्र पाठवून केली आहे. या पत्रात म्हटले आहे, मतदार ओळखपत्र आधार कार्डला जोडण्याचे अधिकार दिले जावेत. हा जर निर्णय झाला तर यापुढे आधार कार्डला मतदान कार्ड जोडले जाणार आहे. त्यामुळे बोगस मतदार ओळखपत्रांना चाप बसेल, असा विश्वास आयोगाने व्यक्त केला आहे.  


दरम्यान, मतदार ओळखपत्र आधार कार्डला जोडण्याची मागणी निवडणूक आयोगाने यापूर्वीही केंद्र सरकारकडे केली होती. मात्र, त्यावेळी आधार कार्ड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित होत्या. त्यामुळे सरकारने मतदार ओळखपत्र आणि आधारच्या जोडणीचा विषयाकडे दुर्लक्ष केले होते. आता निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा याबद्दलची मागणी केली आहे. मोदी सरकारने गेल्या काही दिवसांमध्ये अनेक निर्णय घेतले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या मागणीचा सकारात्मक विचार होईल, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे.