मोदींना क्लीन चिट देण्यावरुन निवडणूक आयोगातील मतभेद चव्हाट्यावर
मोदी यांना क्लीन चिट देण्यावरुन निवडणूक आयोगातील मतभेद चव्हाट्यावर आलेत.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट देण्यावरुन निवडणूक आयोगातील मतभेद चव्हाट्यावर आलेत. निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी आयोगाच्या बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला आहे. निवडणूक आयोगाच्या बैठकीत सहभागी होऊ नये यासाठी दबाव टाकल्याचा आरोप लवासांनी केला आहे.
निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी मागणी केली आहे की, एखाद्या प्रकरणात आयोगातील तीन आयुक्तांपैकी जर एका आयुक्ताचे मत हे अन्य दोन सदस्यांपेक्षा वेगळे असेल तर आदेशामध्ये तशी नोंद झालीच पाहिजे. लवासा यांनी यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा दाखला दिला आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी लवासांच्या आरोपावर प्रतिक्रीया दिली आहे. निवडणूक आयोगातील तीन आयुक्तांमध्ये मतमतांतर असू शकतात असे सांगत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. आयुक्तांमधील या पत्रव्यवहारामुळे निवडणूक आयोगाच्या प्रतिमेला मात्र धक्का बसला आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे.