वरिष्ठ नेत्यांनी पराभवाचं खापर डोक्यावर फोडलं, सिद्धरामय्या भावूक
काँग्रेस आमदारांच्या बैठकीत आपल्या सरकारच्या चांगल्या कामानंतरही झालेल्या पराभवानं सिद्धरामय्या भावूक झाले.
बंगळुरू : कर्नाटकचे मावळते मुख्यमंत्री सिद्धरामय्या बुधवारी पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत भावूक झाले. विधानसभा निवडणुकीत झालेल्या काँग्रेसच्या दारुण पराभवाबद्दल बोलताना त्यांना आपल्या भावना अनावर झाल्या. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षाच्या पराभवासाठी सिद्धरामय्या यांनाच जबाबदार धरलं... त्यांनी उमेदवारांची निवड आणि लिंगायत मुद्यावर सिद्धरामय्या यांना मिळालेली सूट ही कारणं देत परात्रभवाचं खापर सिद्धरामय्या यांच्यावर फोडलंय.
दरम्यान, मावळते गृहमंत्री रामलिंगा रेड्डी यांच्या म्हणण्यानुसार, या बैठकीत तीन-चार सोडून बाकीचे सर्व आमदार उपस्थित होते. असं असलं तरी अद्याप सर्व आमदार पक्षाच्या संपर्कात असल्याचंही रेड्डी यांनी सांगितलंय.
या बैठकीत उपस्थित असलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस आमदारांच्या बैठकीत आपल्या सरकारच्या चांगल्या कामानंतरही झालेल्या पराभवानं सिद्धरामय्या भावूक झाले.
११७ आमदारांची यादी राज्यपालांकडे
कर्नाटकातला सत्तासंघर्ष अधिक तीव्र झालाय. काँग्रेस आणि जेडीएसच्या नेत्यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतली. यावेळी जेडीएस आणि काँग्रेसनं बहुमत असल्याचा दावा करत ११७ आमदारांच्या नावांची यादी राज्यपालांना सोपवली. जेडीएसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार एच डी कुमारस्वामी आणि काँग्रेसचे नेते हजर होते. यावेळी मात्र राज्यपालांनी सत्ता स्थापनेच्या निमंत्रणाबाबत कुठलंही आश्वासन दिलं नाही. मात्र, घटनेला धरून निर्णय घेण्यात येईल असं राज्यपालांनी सांगितल्याचं समजतंय. तर, सत्तास्थापनेसाठी जे काही करावं लागेल ते काँग्रेस जेडीएस करणार असल्याचं सांगत न्यायलयात धाव घेण्याचे संकेत काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी दिले आहेत. त्यामुळे जेडीएस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राजभवनासमोर जोरदार घोषणाबाजी केली.