मुंबई : Infosys Employees | देशातील दुसरी सर्वात मोठी सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिस सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. तिमाहीचे निकालाचे आकडे बघितले तर त्यात कमालीची वाढ झाल्याचे लक्षात येईल. कंपनीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी-मार्च 2022 च्या तिमाहीत 27.7% कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

27.7 टक्के लोकांनी नोकरी सोडली


Infosys ने 2021-22 मध्ये जागतिक स्तरावर 85,000 फ्रेशर्सना रोजगार दिला. कंपनी चालू आर्थिक वर्षात 50,000 नवीन लोकांना रोजगार देण्याच्या तयारीत आहे. मार्च तिमाहीत कंपनी सोडलेल्यांची टक्केवारी 27.7 टक्के होती. आयटी उद्योगातील टॅलेंटची वाढती मागणी आणि बदलत्या तंत्रज्ञानामुळे कंपनी सोडणाऱ्या लोकांची टक्केवारी जास्त आहे.


कंपनीला 12 टक्के नफा


गेल्या आर्थिक वर्ष 2021-22 च्या जानेवारी-मार्च तिमाहीत इन्फोसिसचा एकत्रित निव्वळ नफा 12 टक्क्यांनी वाढून 5686 कोटी रुपयांवर पोहोचल्याचे कंपनीने म्हटले आहे.


रशियातील व्यवसाय बंद 


कंपनीने म्हटले आहे की, ती रशियातील आपले युनिट बंद करून बाहेर पडणार आहे. युक्रेनवरील हल्ल्यानंतर रशियातून बाहेर पडणाऱ्या कंपन्यांच्या यादीत इन्फोसिसचा समावेश झाला आहे. इन्फोसिसने सांगितले की, ते सध्या रशियामधील त्यांच्या ग्राहकांसोबत कोणताही व्यवसाय करत नाही आणि भविष्यात त्यांच्यासोबत काम करण्याचे कोणतेही नियोजन नाही.