`...तर प्रभू रामचंद्रही जिंकू शकले नसते`
निवडणुकांमध्ये पैशांचा वापर प्रचंड वाढला आहे.
पणजी: आजच्या काळातील राजकीय परिस्थिती पाहता प्रभू रामचंद्रांनाही निवडणूक जिंकण्यासाठी पैसे खर्च करावे लागले असते, असे विधान गोवा प्रांताचे माजी संघप्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी केले. ते बुधवारी पणजीतील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, निवडणुकीच्या काळात राजकारणी तरुण आणि महिलावर्गाला पैसे आणि भेटवस्तुंचे आमिष दाखवतात. गेल्या काही काळात निवडणुकांमध्ये पैशांचा वापर प्रचंड वाढला आहे. ही परिस्थिती पाहता, आज प्रभू रामचंद्र असते तर त्यांनाही पैसे वाटल्याशिवाय निवडणूक जिंकणे शक्य नव्हते, असे वेलिंगकर यांनी म्हटले.
सुभाष वेलिंगकर यांनी २०१७ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी ते भाजपमधून बाहेर पडले होते. त्यांनी गोवा सुरक्षा मंच या पक्षाची स्थापना केली होती.
काही दिवसांपूर्वीच प्रकृतीच्या कारणामुळे राज्याच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांना पदमुक्त करण्यात आले होते. यावरुनही वेलिंगकर यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना लक्ष्य केले होते. पर्रिकरांनी या मंत्र्यांना प्रकृतीच्या कारणामुळे मंत्रिमंडळातून काढले. मात्र, पर्रिकरांची स्वत:ची प्रकृती गंभीर आहे. तरीही त्यांनी मुख्यमंत्रीपद सो़डले नाही, अशी टीका वेलिंगकर यांनी केली होती.