प्रत्येक चार तासाला एक बँक कर्मचारी घोटाळ्यात अडकतो : आरबीआय अहवाल
प्रत्येक चार तासाला एक अशा प्रामाणात बॅंक कर्मचारी घोटाळा प्रकरणात अडकतात, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. रिजर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (आरबीआय) ने जाहीर केलेल्या एका अहवालात ही माहिती पुढे आली आहे.
मुंबई : प्रत्येक चार तासाला एक अशा प्रामाणात बॅंक कर्मचारी घोटाळा प्रकरणात अडकतात, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. रिजर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (आरबीआय) ने जाहीर केलेल्या एका अहवालात ही माहिती पुढे आली आहे.
५,२०० कर्मचाऱ्यांना घोटाळा प्रकरणात शिक्षा
१ जानेवारी २०१५ ते ३१ मार्च २०१७ या काळात सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांमधील ५,२०० कर्मचाऱ्यांना घोटाळा प्रकरणात शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आरबीआयने जाहीर केलेल्या माहितीनुसार, घोटाळ्यात सापडलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांना दंड, निलंबन आणि बडतर्फ अशा प्रकारच्या शिक्षा गुन्हाचे स्वरूप पाहून करण्यात आल्या आहेत. रिझर्व्ह बॅंकेने एप्रिल २०१७ ते आतापर्यंतच्या बॅंक घोटाळ्यांमध्ये दोषी असलेल्या कर्मचाऱ्यांची एक यादीच तयार केली आहे.
एसबीआयचे कर्मचारी अधिक दोषी
विशेष असे की, सार्वजनिक क्षेत्रात काम करत असलेल्या बॅंकांपैकी घोटाळ्यात अडकलेल्या अधिकाऱ्यांच्या संख्येपैकी एसबीआयचे कर्मचारी अधिक दोषी आढळले आहेत. प्राप्त माहितीनुसार एसबीआयच्या १,५३८ कर्माचाऱ्यांना फसवणुकीच्या आणि घोटाळा प्रकरणात कारवाईला सामोरे जावे लागले आहे. त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बॅंक आणि त्यानंतर सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी सर्वाधीक घोटाळा केल्याचेही पुढे आली आहे.
१७०४ प्रकरणात तब्बल ६६ हजार कोटींचे नुकसान
दरम्यान, आरबीआयने या सर्व घोटाळा प्रकरणांमध्ये बॅंकांना किती प्रमाणात आर्थिक तोटा झाला याबाबत माहिती दिली नाही. आरबीआयनुसार, १ एप्रिल २०१३ ते ३१ डिसेंबर २०१६ या काळात सर्व कमर्शीअल बॅंकांना (खासगी बॅंकांसह) १७०४ प्रकरणात तब्बल ६६ हजार कोटींचे नुकसान झाले आहे.