नोटाबंदी हा मोठा `मौद्रिक झटका` - माजी मुख्य आर्थिक सल्लागार सुब्रह्मण्यम
`ऑफ काऊन्सिल : द चॅलेंजेस ऑफ द मोदी-जेटली इकोनॉमी` पुस्तक प्रकाशन सोहळा
नवी दिल्ली : नोटाबंदी हा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोठा 'मौद्रिक झटका' होता, असं पंतप्रधानांचे माजी आर्थिक सल्लागर अरविंद सुब्रह्मण्यम यांनी म्हटलंय. सुब्रह्मण्यम यांच्या 'ऑफ काऊन्सिल : द चॅलेंजेस ऑफ द मोदी-जेटली इकोनॉमी' या गुरुवारी प्रकाशित झालेल्या पुस्तकात त्यांनी हा उल्लेख केलाय. नोटाबंदी झाल्यानंतर सुब्रह्मण्यम यांनी जी प्रतिक्रिया दिली होती, त्याच्या बरोबर उलट मत त्यांनी या पुस्तकात मांडलंय. त्यावेळी आपण नोटाबंदीचं समर्थन केलं असलं, तरी अभ्यासाअंती नोटाबंदी हा भारतीय अर्थव्यवस्थेला बसलेला मोठा धक्काच असल्याच्या निष्कर्षाप्रती आल्याचं सुब्रह्मण्यम यांनी म्हटलंय.
नोटबंदी म्हणजे कठोर पाऊल आणि मौद्रिक झटका असल्याचं सुब्रह्मण्यम यांनी म्हटलंय. ज्यामुळे अर्थव्यवस्था कोसळली आणि पुढचे सात तिनमाहीपर्यंत कोसळत राहीली... जी आत्ता ६.८ टक्क्यांवर येऊन ठेपलीय... नोटबंदीपूर्वी अर्थव्यवस्थेचा दर ८
टक्क्यांवर पोहचला होता.
यानंतर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनीही गुरुवारी मोदी सरकारवर निशाणा साधलाय. काँग्रेसनं ट्विटरवर म्हटलंय, 'माजी सीईएनं शेवटी नोटबंदीमुळे झालेल्या पडझडीवर आपल्या वास्तविक भावनांना उघड केल्याच... सरकारमध्ये राहून सर्वोच्च नेत्यावर टीका शक्य नव्हती, हे तर स्पष्टच होतं'.
तर काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांच्या म्हणण्यानुसार, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे २०१६ मध्ये ८ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आलेल्या नोटबंदीवर 'अपारदर्शता' निर्माण टीकून राहिलीय... सुब्रह्मण्यम यांची ही जबाबदारी आहे की त्यांनी देशाला सांगावं, हे सर्व कसं झालं'.