मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने देशातील रेल्वेसेवा बंद आहे. मात्र, विशेष रेल्वे गाड्या चालविण्यात येत आहेत. दरम्यान, देशात प्रवासी गाड्यांच्या सामान्य वाहतुकीवर बंदी असली तरीही येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सण-उत्सव पाहता रेल्वे मंत्रालयाकडून विशेष गाड्यांची संख्या वाढविण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या महिन्यात, रेल्वे मंत्रालय सणाच्या हंगामात प्रवासाची मागणी पाहता आणखी ८० विशेष गाड्या चालवण्याची घोषणा करू शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दसरा, नवरात्र, दीपावली, भाई दूज असे मोठे सण असणार आहेत. खासकरुन उत्तर भारतात प्रवासी मागणी वाढत आहे. मागणीनुसार रेल्वे मंत्रालय अशा मार्गांवरील विशेष गाड्या वाढवू शकते, असे सांगण्यात येत आहे. या गाड्यांची घोषणा ऑक्टोबरमध्ये होऊ शकते. विशेष म्हणजे सप्टेंबरमध्येच रेल्वेने ८० विशेष आणि ४० क्लोन गाड्या चालवण्याच्या सूचना दिल्या होत्या.



रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी सप्टेंबरच्या सुरूवातीला १२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ८० गाड्यांची माहिती दिली होती. या गाड्यांचे आरक्षण १० सप्टेंबरपासून सुरू झाले आहे. या विशेष गाड्यांव्यतिरिक्त २३० गाड्या यापूर्वीच सुरू आहेत.


रेल्वे बोर्डाचे (Railway Board)अध्यक्ष यादव यांनी सांगितले, जेव्हा जेव्हा विशेष ट्रेनची आवश्यकता असते, जेथे जेथे प्रतीक्षा यादी जास्त असेल त्याठिकाणी आम्ही मूळ रेल्वेनंत अशीच (क्लोन) रेल्वे चालवू. जेणेकरून प्रवासी तेथे प्रवास करू शकतील. परीक्षा किंवा इतर कोणत्याही कारणासाठी राज्यांच्या विनंतीनुसार रेल्वे चालविली जाईल.


भारतीय रेल्वे  (Indian Railways) अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठीही विशेष गाड्या चालविण्यात आल्या आहेत. बिहारमध्ये प्रवेश परीक्षेसाठी विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.