मुंबई : युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) ने व्यक्तीची ओळख पडताळणीसाठी नवी सुविधा देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार पैसे काढण्यासाठी आणि रेशन तसेच सिमकार्ड मिळण्यासाठी पुरावा म्हणून आधारकार्डाची सक्ती आहेच. मात्र, आधारकार्डाच्या आधारे व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी आत्तापर्यंत बोटाचे ठसे घेणे आणि आयरिस स्कॅनचा(डोळ्यांच्या आधारे ओळख पटवणे) वापर केला जात होता. UIDAI म्हणजेच विशिष्ट ओळख प्राधिकरणाने आता यामध्ये चेहऱ्यावरून ओळख पटवण्याचाही समावेश केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही सुविधा सुरुवातील टेलीकॉम सर्व्हिसेस कंपन्यांसाठी बंधनकारक आहे. १५ सप्टेंबरपासून ही सुविधा सुरु होणार आहे. चेहरा ओळख पटल्यानंतर नवीन सिम कार्ड मिळेल. यानंतर ही सेवा बँक, पीडीएस आणि सरकारी कार्यालयात हजेरीसाठीही याचा उपयोग केला जाणार आहे. UIDAI प्राधिकरणाने आधी १ जुलै रोजी चेहरा ओळखची अंमलबजावणी करण्याचे नियोजन केले होते. मात्र, ते होऊ शकले नाही. त्यानंतर १ ऑगस्ट तारीख जाहीर करण्यात आली होती.   



दरम्यान, अनेकवेळा वयोवृद्धांना बोटाचे ठसे पुसट झाल्याने आधारद्वारे ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत. त्यावर उपाय म्हणून फेशिअल रेकग्निशन म्हणजेच चेहऱ्याद्वारे ओळख पटवण्याचा पर्याय पुढे आलाय. यूआयडीए प्राधिकरणाने नवा पर्याय वापरण्याची सक्ती केली आहे. हा पर्याय न वापरल्यास संबंधित कंपनीच्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते आणि त्यांच्याकडून दंडही वसूल केला जाऊ शकतो.  


विशिष्ट ओळख प्राधिकरणाने दूरसंचार कंपन्यांना नव्या सिमकार्डांसाठी आधार ओळख प्रक्रियेत १५ सप्टेंबरपासून  महिन्याला १० टक्के ग्राहकांची ओळख पटवण्याचे काम हे चेहरा ओळख पद्धतीने करण्याचे आदेश दिले आहेत. १० टक्क्यांपेक्षा कमी ग्राहकांची आधार ओळख ही वेगळ्या पद्धतीने करण्यात आली तर त्यांना प्रत्येक जोडणीमागे २० पैसे दंड आकारला जाईल. जर सिमकार्ड किंवा अन्य बाबींसाठी आधार कार्डाऐवजी दुसरी कागदपत्रे पुराव्यासाठी देण्यात आली तर या पद्धतीचा अवलंब करण्यात येणार नाही.