NSA Ajit Doval Viral Post: सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. या पोस्टमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असलेले अजित डोवाल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएसबद्दल विधान केल्याचा दावा केला जात आहे. या पोस्टचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र या पोस्टमागील सत्य आता समोर आलं आहे.


व्हायरल पोस्टमध्ये काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित डोवाल यांच्या नावाने शेअर होत असलेल्या या पोस्टमध्ये 'अजित डोवाल' नावाच्या अकाऊंटवरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदूंना इस्लामपासून वाचवत असल्याचा दावा करण्यात आला आहे. आरएसएसमुळे हिंदू सुरक्षित असल्याचा दावा या पोस्टमधून करण्यात आला आहे. हीच पोस्ट शेअर करत, "हा अजित डोवाल यांचा मेसेज आहे. ज्यांना समजतं त्यांना हे कळेल की पूर फार वेगाने येणार. त्याला कोणीही रोखू शकणार नाही. हिंदू सुखाने खाऊन झोपा काढत आहेत," अशा कॅप्शनसहीत व्हायरल करण्यात आली आहे. तुम्हीच पाहा व्हायरल झालेली ही पोस्ट...



(सौजन्य: X (पूर्वीचं ट्वीटर)/स्क्रीन शॉट)


सत्य काय?


अजित डोवाल यांच्या नावाने ही पोस्ट शेअर होत असली तरी ही फेक म्हणजेच पूर्णपणे खोटी पोस्ट आहे. यामागील कारण म्हणजे अजित डोवाल सोशल नेटवर्किंगवर नाहीत. त्याचं कोणतंही अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट अस्तित्वात नाही. 


ही पोस्ट कशी तयार केली?


गुगल लेन्सवर व्हायरल झालेलं हे कथित ग्राफिक्स सर्च केलं तर 'नो युआर मीम' नावाच्या वेबसाईटवर अशाप्रकारची अनेक मिम्स दिसून येतात. 'डॅम एडीट्स' नावाखाली ही मिम्स सापडतात. 2016 पासून अशी मिम्स व्हायरल होत आहेत. हे मिम टॅम्पलेट प्रचंड लोकप्रिय झालं असून अनेकांनी यापूर्वी वेगवेगळ्या हेंतूसाठी हे शेअर केलं आहे. 



(सौजन्य: Know Your Meme/स्क्रीन शॉट)


सरकारनेच केलेला खुलासा की कोणतंही अधिकृत अकाऊंट नाही


अजित डोवाल यांचं कोणतंही सोशल मीडिया अकाऊंट नसल्याची अधिकृत घोषणा देशाच्या परराष्ट्र मंत्रालयानेच एका जुन्या पोस्टमध्ये केली होती. भारत सरकारअंतर्गत येणाऱ्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन 8 नोव्हेंबर 2021 साली करण्यात आलेल्या पोस्टमध्ये, "महत्त्वाची सूचना, अजित डोवाल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचं फेसबुकवर कोणतंही अधिकृत अकाऊंट नाही. त्यांच्या नावाखाली खोटे अकाऊंट्स चालवले जातात यासंदर्भातील हा इशारा आहे," असं म्हटलं होतं. या पोस्टचा स्क्रीन शॉट खाली पाहता येईल.



त्यांच्या नावाने अनेक पेजेस आणि अकाऊंट्स


अजित डोवाल यांच्या नावाने फेसबुकवर अनेक अकाऊंट्स आहेत. हे अकाऊंट्स किंवा पेजेस चाहत्यांनी सुरु केलेली आहेत. मात्र याचा थेट सरकार किंवा अजित डोवाल यांच्याशी काहीही संबंध नाही. यापैकी काही पेजेसला लाखोंच्या संख्येनं फॉलोअर्स असल्याचं 'द क्विंट'ने केलेल्या फॅक्ट चेकमध्येही नमूद करण्यात आलेलं आहे. मात्र या पेजेसवरुन तसेच अकाऊंटवरुन केल्या जाणाऱ्या पोस्टशी सरकारचं किंवा अधिकृत यंत्रणेंचं काहीही देणं घेणं नाही.



व्हायरल पोस्ट खोटीच


वरील सर्व गोष्टींचा विचार केल्यास सध्या व्हायरल होणारी पोस्ट अजित डोवाल यांनी केलेली नाही ती फेक असल्याचं सिद्ध होत आहे.