एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्याला CBI, कस्टम्स, अंमली पदार्थ आणि आयकर अधिकारी असल्याचं भासवत 85 लाखांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. स्काईपच्या माध्यमातून ही फसवणूक करम्यात आली. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे हा प्रकार घडला असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीतही याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या टोळीने चेकद्वारे पैसे घेतले आणि दिल्लीतील उत्तम नगरमध्ये एचडीएफसी खाते चालवणाऱ्या 'राणा गारमेंट्स' नावाच्या कंपनीकडे हस्तांतरित केले. विशाखापट्टणममध्ये पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार या टोळीने 'राणा गारमेंट्स'द्वारे चालवल्या जाणाऱ्या एचडीएफसी खात्यातून भारतभरातील 105 खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केले. एचडीएफसीच्या उत्तम नगर ब्रांचनेही पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.


"माझ्या सेवेची तीन वर्षे बाकी होती, पण माझ्या मुलाला कॉलेजमध्ये पाठवण्यासाठी वेळ हवा असल्याने स्वेच्छानिवृत्ती घेतली. मला 2 मे रोजी सेवानिवृत्तीनंतरचे पैसे मिळाले. 17 मे रोजी माझ्या मुलाची व्हिसासाठी अपॉईंटमेंट होती. पण 14 मे रोजी, मला या टोळीने 85 लाखांचा गंडा घातला. मी त्यांना पैसे पाठवले होते. सर्व रेकॉर्ड तपासल्यानंतर पैसे परत पाठवू असं त्यांनी सांगितलं होतं," असं 57 वर्षीय निवृत्त कर्मचाऱ्याने सांगितलं. जर्मनीत मुख्यालय असलेल्या एका फार्मा कंपनीत ते सहयोगी महाव्यवस्थापक होते. 


विशाखापट्टम क्राईन ब्रांचने या प्रकरणाचा तपास आपल्या हाती घेतला आहे. प्रकरणाचा तपास सुरु असून, आम्हाला काही धागेदोरे सापडले आहेत असं त्यांनी सांगितलं आहे. विशाखापट्टणममधील बँकेतील काही आतील व्यक्तींचा सहभाग असू शकतो, असा आरोप सेवानिवृत्त अधिकाऱ्याने केला आहे, कारण या टोळीला त्याच्या खात्याबद्दल सर्व काही माहीत होते ज्यात त्याला सेवानिवृत्तीनंतर नेमकी किती रक्कम मिळाली होती. "टोळीने मला जवळच्या HDFC बँकेत जाऊन चेक टाकण्यास सांगितले," अशी माहिती त्यांनी दिली आहे.


गुन्हे शाखेने विशाखापट्टणममधील एचडीएफसी बँकेच्या शाखेतून अनेक कागदपत्रे घेतली आहेत. "एचडीएफसी बँकेने गुन्हे शाखेला सहकार्य करत असल्याचं सांगितलं आहे. मी पोलिसांनाही सांगितलं आहे की, उत्तम नगर (दिल्ली) शाखेने राणा गारमेंट्ससाठी केवायसी केले नाही का? दिल्लीतील पोलिसांनी राणा गारमेंट्समध्ये जाऊन शोध घेतला. पण तिथे वेगळी कंपनी होती. राणा गारमेंट्सच्या मालकाचा शोध घेणे अशक्य आहे," असं निवृत्त अधिकाऱ्याने सांगितलं.


एफआयआरनुसार, सेवानिवृत्तीनंतरची बचत अधिकाऱ्याच्या एचडीएफसी बँक खात्यात जमा झाल्यानंतर, त्याला "डीसीपी सायबर क्राइम बलसिंग राजपूत" अशी ओळख सांगणाऱ्या एका व्यक्तीचा फोन आला. त्याने निवृत्त अधिकाऱ्याला सांगितलं की त्याचं नाव अंमली पदार्थ आणि मनी लाँड्रिंगच्या अनेक प्रकरणांमध्ये आलं आहे आणि या सर्व प्रकरणांशी त्यांचे आधार लिंक केले गेले आहे. बनावट डीसीपीने नंतर दुसऱ्या व्यक्तीला फोन केला आणि वरिष्ठ अधिकारी असल्याचं भासवलं आणि त्यांनी निवृत्त व्यक्तीविरूद्ध एफआयआर दाखल करावा का? असं विचारलं.


"माझ्यावर प्रचंड दबाव होता. मला तुरुंगात टाकले जाईल अशी धमकी दिली. बनावट डीसीपीने त्याच्या बनावट बॉसशी थोडावेळ बोलून सांगितले की मी निर्दोष आहे. तुम्ही आम्हाला 85 लाख पाठवा, तपासानंतर जर तुम्ही निर्दोष आढळलात तर ते परत करु असं सांगितलं,” असं निवृत्त अधिकाऱ्याने सांगितलं. "स्काईपवर 2 दिवस माझी चौकशी सुरु होती. त्यांनी मला घर सोडू दिले नाही किंवा कोणाला फोन करू दिला नाही," असंही ते म्हणाले.


पैसे परत केली जातील असं आश्वासन देत अखेर निवृत्त अधिकाऱ्याला विशाखापट्टणममधील एचडीएफसी बँकेच्या शाखेत धनादेश जमा करण्यास सांगण्यात आलं. राणा गारमेंट्सच्या खात्यातून 85 लाख हस्तांतरित केलेल्या वेगवेगळ्या बँकांच्या 105 खात्यांपैकी कोणत्याही खात्याचा मागोवा घेण्यात पोलिसांना यश आले आहे का? असं विचारण्यात आलं असता निवृत्त अधिकाऱ्याने सांगितलं की, पोलिसांनी आतापर्यंत झालेल्या तपासाची माहिती देण्यास नकार दिला आहे. 


सेवानिवृत्त अधिकाऱ्याने लोकांना अनोळखी नंबरवरून व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलला उत्तर देऊ नका असा सल्ला दिला आहे. "फसवणुकीची रक्कम तुम्हाला धक्का देईल. एका महिन्यात, विशाखापट्टणम सायबर पोलिसांना 300 कोटी रुपयांच्या तक्रारी आल्या," असा दावा त्यांनी केला आहे.