Divorce Case Family court: पती पत्नीमध्ये घटस्फोट झाल्यावर पती पत्नीला दर महिन्याला पोटगी देतो, असे निकाल आपण ऐकले असतील. पण पत्नीनेच पतीला पोटगी देण्याचा निकाल कधी ऐकलाय का? हो. असं प्रत्यक्षात घडलंय. त्यामुळेच इंदूरमधील कौटुंबिक न्यायालया एक आदेश चर्चेचा विषय बनला आहे. यामध्ये पत्नीने पतीला दर महिन्याला पोटगी द्यावी,असे आदेश कौटुंबिक न्यायालयाने दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंदूरच्या फॅमिली कोर्टात २३ वर्षीय राजेश (नाव बदलले आहे) आणि २२ वर्षीय चांदनी (नाव बदलले आहे) यांचा खटला सुरू होता. या खटल्याचा निकाल ऐतिहासिक ठरला आहे. राजेश आणि चांदनीची ओळख एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि दोघेही बोलू लागले. चांदनी ब्युटी पार्लरचा व्यवसाय करते तर राजेश हा बारावी उत्तीर्ण आहे. आपली कमाई ही पत्नीच्या कमाईपेक्षा कमी आहे, याची जाणिव राजेशला होती. त्याने चांदनीलाही याची माहिती दिली होती. 


पत्नीसोबत गुदमरल्यासारखे


चांदनी मला पसंत करू लागली होती म्हणून मी तिला प्रपोज केल्याचे राजेश सांगतो. मला तिच्याशी लग्न करायचे नव्हते. मात्र लग्न न केल्यास मी आत्महत्या करेन अशी धमकी चांदनीने आपल्याला दिल्याचेही त्याने सांगितले. याच दबावाखाली राजेशने 2021 मध्ये आर्य मंदिरात चांदनीशी लग्न केले. राजेशचे कुटुंबीय त्याच्या लग्नावर खूश नव्हते. आपण चांदनीसोबतही गुदमरल्यासारखे आयुष्य जगत असल्याची भावना राजेशच्या मनात होती. 


पत्नी नेहमी द्यायची त्रास 


चांदनी मला नेहमी त्रास देत असे असे राजेश सांगतो. चांदनीच्या त्रासाला कंटाळून आपण एकेदिवशी पळून गेलो आणि घरच्यांना सगळी हकीकत सांगितल्याचे त्याने सांगितले. यानंतर राजेशने पोलिसांत तक्रार दाखल केली. आपल्याला होत असलेल्या त्रासाबद्दल राजेशने गुन्हा दाखल केला. यानंतर चांदनीही आक्रमक झाली. तिने राजेशवर घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला. आपण काही काम करत नाही असे चांदनीने न्यायालयात सांगितले. यानंतर तिने राजेशकडे देखभालीची मागणीही केली. 


'मी बारावी पास'


यानंतर कोर्टाने राजेशला आपली बाजू मांडण्याची संधी दिली. मी 12वी पास आहे. चांदनीमुळे माझा अभ्यास राहून गेला. तिने माझा खूप छळ केला म्हणून मी घरातून पळून गेलो असे राजेशने कोर्टात सांगितले. 


चांदीनीचे खोटे पकडले गेले


मी हरवलोय अशी तक्रार चांदनीने पोलीस ठाण्यात केली होती. त्यावेळी आपण ब्युटी पार्लर चालवतो, असे तिने म्हटले होते. कोर्टाला चांदनीविरोधात हा पुरावा सापडला. चांदनी माझ्यावर नव्हे तर मी पूर्णपणे तिच्यावर अवलंबून आहे, असे राजेशने कोर्टात सांगितले. त्यामुळे चांदनीचे खोटे पकडले गेले. यानंतर न्यायालयाने महत्वूर्ण निकाल दिला. त्यानुसार पत्नी चांदनीने पती राजेशला दरमहा 5 हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले. असा निकाल पहिल्यांदाच आल्याने या निर्णयाची सगळीकडे चर्चा सुरु आहे.