इंदूर : अध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. भय्यू महाराजांनी उजव्या कानशिलात गोळी झाडल्याचं बोललं जात आहे. गोळी झाडून घेतल्यानंतर भय्यू महाराजांना इंदूरच्या बॉम्बे रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. आत्महत्येनंतर भय्यू महाराजांची सुसाईड नोट समोर आली आहे. मी तणावातून आत्महत्या केलेली आहे. माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही, असं भय्यू महाराज या सुसाईड नोट मध्ये म्हणाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुटुंबाचीही चौकशी होणार


भय्यू महाराजांची सुसाईड नोट आणि पिस्तूल पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी भय्यू महाराजांच्या कुटुंबाचीही चौकशी होणार आहे. तसंच याचा तपास सर्व बाजूंनी करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. मानसिक तणावामुळे आत्महत्या करत असल्याचं भय्यू महाराजांनी सांगितलं असलं तरी त्यांना नेमका कोणता तणाव होता याची माहिती मिळालेली नाही. याचा तपास सुरु असल्याचंही पोलीस म्हणाले.


भय्यू महाराजांच्या आत्महत्येचं कारण काय?


वैवाहिक जीवनात तणाव?


वर्षभरापूर्वीच भय्यू महाराज दुसऱ्यांदा बोहल्यावर चढले होते. ३० एप्रिल २०१७ रोजी ग्वालियर स्थित डॉ. आयुषी शर्मा हिच्यासोबत त्यांनी दुसरा विवाह केला होता. आई आणि मुलीच्या काळजीपोटी आपण दुसरा विवाह करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. दुसऱ्या विवाहानंतर त्यांच्या घरात तणावाचं वातावरण असल्याचं सांगण्यात येतंय. भय्यू महाराज यांच्या पहिल्या पत्नीचं आधीच निधन झालं होतं. त्यांना एक मुलगीही आहे


कौटुंबिक कलह


भय्यू महाराज यांच्या आत्महत्येमागे कौटुंबिक कलहाचं कारणही चर्चेत आहे. कौटुंबिक कलहाला कंटाळून त्यांनी स्वत:वर गोळी झाडल्याचीही शक्यता वर्तवण्यात येतेय.


कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या?


९० च्या दशकात 'सियाराम' कपड्यांसाठी मॉडेलिंग करणाऱ्या महागड्या घड्याळांची आणि कपड्यांची आवड होती... अध्यात्माची आवड असणाऱ्या भय्यूजी महाराजांनी आश्रम उभारण्यासाठी कर्ज घेतलं होतं... कर्ज शकत नसल्यानंही ते निराशेत बुडाले होते, अशीही माहिती मिळतेय. कर्जबाजारीपणाला कंटाळून भय्यू महाराजांनी आत्महत्या केल्याचाही संशय व्यक्त केला जातो. 


सीबीआय चौकशीची मागणी


सरकारनं भय्यू महाराजांवर पाठिंबा देण्यासाठी दबाव आणला होता. यासाठी भय्यू महाराजांना आमिषही दाखवण्यात आली. ही आमिषं भय्यू महाराजांनी नाकारली. या सगळ्या प्रकारामुळे भय्यू महाराजांवर प्रचंड मानसिक दबाव होता. त्यामुळे याची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी मध्य प्रदेश काँग्रेसचे नेते मानक अगरवाल यांनी केली आहे.


भय्यू महाराजांची मंत्री म्हणून नियुक्ती


मध्य प्रदेशमधल्या शिवराज सिंह चौहान सरकारनं काही अध्यात्मिक गुरूंची मंत्री म्हणून नियुक्ती केली होती. नर्मदा नदी स्वच्छतेचं अभियान हे धर्मगुरू राबवणार होते. या गुरूंमध्ये भय्यू महाराज यांच्या नावाचाही समावेश होता.