अफगाणिस्तानपेक्षा जास्त क्रुरता भारतात! प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांचं वादग्रस्त वक्तव्य
तालिबान्यांचं समर्थन करत राणा यांनी उत्तर प्रदेशची तुलना तालिबानी राजवटीशी केली आहे
लखनऊ : उत्तर प्रदेशमधले प्रसिद्ध हिंदी कवी मुनव्वर राणा (Munawwar Rana) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मुनव्वर राणा यांनी तालिबानच्या (Taliban) कृत्याचं समर्थनक केलं आहे. अफगाणिस्तानपेक्षा (Afghanistan) अधिक क्रूरता भारतात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे, ‘पहले रामराज था, अब कामराज है’, अशी टीका त्यांनी केली आहे.
उत्तर प्रदेशची तुलना तालिबानी राजवटीशी
तालिबानचा बचाव करताना मुनव्वर राणा म्हणाले, लोक अफगाणिस्तानातून पळून जात आहेत, कोणीही कोठूनही पळून जाऊ शकतात. 'यूपीची अवस्था पाहून इथूनंही पळून जावंसं वाटतं' असं सांगत त्यांनी उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) तुलना तालिबानी राजवटीशी केली आहे. अफगाणिस्तानने भारताचं कधीही नुकसान केलं नाही, अफगाणिस्तान भारताचा सर्वात चांगला मित्र आहे, 'तालिबानी नव्हे त्यांना अफगाणी म्हणायला हवं' असंही मुनव्वर राणा यांनी म्हटलं आहे.
20 वर्षांपासून अन्याय
'तालिबान वाईट लोक नाहीत, परिस्थितीमुळे ते असे झाले आहेत, 20 वर्षांपासून तिथे दडपशाही होत आहे, जी अन्यायाची बीजं 20 वर्षं रोवली गेली, त्यातून गोड फळं कशी मिळतील', असा सवाल त्यांनी केला आहे. ते म्हणतात की 'अफगाणिस्तान हा नेहमीच भारताचा मित्र राहिला आहे. तिथल्या लोकांना भारताबद्दल विशेष प्रेम आहे, म्हणूनच त्यांना इथं यायला आवडतं'.
महर्षी वाल्मिकींशी तुलना
'भारताने अफगाणिस्तानला नव्हे तर पाकिस्तानला घाबरण्याची गरज आहे', तालिबानचा काश्मीरशी काहीही संबंध नाही असं म्हणत मुनव्वरप राणा यांनी तालिबानी दहशतवाद्यांची तुलना महर्षी वाल्मिकीशी केली आहे. वाल्याचा वाल्मिकी झाल्याच्या घटनेचा संदर्भ देत तालिबानचंही तसंच होईल, असा दावा मुनव्वर राणा यांनी केला आहे.