खतांमध्ये राख मिसळून शेतकऱ्यांचे नुकसान होतंय, कृषीमंत्र्यांची कबुली
नकली बियाणं आणि खतं शेतकऱ्याच्या माथी मारून त्यांची फसवणूक तर होते
श्रीकांत राऊत, झी मीडिया, अमरावती : मिश्र खतांमध्ये राख मिसळल्या जात असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केले जात असल्याची खळबळजनक कबुली कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिली आहे. नकली बियाणं आणि खतं शेतकऱ्याच्या माथी मारून त्यांची फसवणूक तर होतेच शिवाय उत्पन्नाच्या बाबतीत त्याच्या हाती काहीही लागत नाही. त्यामुळे आता ज्या जिल्ह्यात असा प्रकार आढळेल तेथे दुसऱ्या जिल्ह्याचं पथक धाड टाकेल आणि कठोर कारवाई होईल असा ईशाराही कृषीमंत्र्यांनी दिला.
अमरावती विभागाचा खरीप हंगामाचा आढावा कृषी मंत्री डॉ अनिल बोंडे यांनी अमरावतीत घेतला प्रत्येक शेतकऱ्याला प्रमाणित बियाणे आणि खतांचा पुरवठा होणे आवश्यक असल्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यवतमाळ जिल्ह्यात मिश्र खतांमध्ये राख मिसळण्याचे काम होत असल्याची माहीती असून अशा उत्पादक, विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी. जर कठोर कारवाई झाली नाही आणि अशा खताची विक्री होत असल्याचे समोर आले तर संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा ईशारा कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिला.
दुसऱ्या जिल्ह्यातील पथकाने बनावट बियाणे किंवा खते पकडल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच संबंधित उत्पादक आणि परवानगी देणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी. शेतकऱ्यांनी देखील असे प्रकार निदर्शनास येताच थेट आपल्याला माहीती द्यावी असेही आवाहन कृषिमंत्र्यांनी केले.