बोर्डाच्या परीक्षेत शेतकऱ्याची मुलगी ठरली अव्वल, मिळवले पैकीच्या पैकी गुण; IAS अधिकारी होण्याची इच्छा
कर्नाटकच्या बागलकोट जिल्ह्यातील शेतकऱ्याची मुलगी अंकिता बसप्पा कोन्नूरने कर्नाटक सेकंडरी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट (SSLC) परीक्षेत 625 पैकी परिपूर्ण 625 गुण मिळवून अव्वल स्थान पटकावलं आहे.
कर्नाटकच्या बागलकोट जिल्ह्यातील शेतकऱ्याची मुलगी अंकिता बसप्पा कोन्नूरने कर्नाटक सेकंडरी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट (SSLC) परीक्षेत 625 पैकी परिपूर्ण 625 गुण मिळवून अव्वल स्थान पटकावलं आहे. अंकिता कोन्नूर मोरारजी देसाई निवासी शाळेची विद्यार्थिनी आहे. आपल्याला आयएएस अधिकारी होण्याची इच्छा असल्याचं अंकिता कोन्नूरने सांगितलं आहे.
"माझ्या कामगिरीमुळे मी फारच उत्साही आहे. मी कधीही जास्त किंवा रात्री जागून अभ्यास केलेला नाही. मी माझ्या ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे अभ्यास करायची. यामुळे मला भितीवर मात करता आली. मला प्री युनिव्हर्सिटीत सायन्स शिकायचं आहे," असं अंकिताने सांगितलं आहे.
अंकिताच्या इंग्रजीचे शिक्षक विनायक यांनी ती फार हुशार विद्यार्थनी असून, सामान्य ज्ञानावर तिची मजबूत पकड असल्याचं सांगितलं आहे. ती नियमितपणे वकृत्व आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेत भाग घेत असे. तिने वकृत्व स्पर्धेत 'चांद्रयान 3' वर बोलत पहिलं पारितोषिकही पटकावलं होतं.
"अंकिता सहावीपासून आमची विद्यार्थिनी आहे. तिला घडामोडींबद्दल नेहमी माहिती असतो. तिचा बुद्ध्यांक फार चांगला आहे. ती गोष्टी लगेच आत्मसात करतो. मोकळ्या वेळेत ती इंटरनेटवर माहिती शोधत असते. नवीन माहिती मिळवण्यासाठी ती नेहमीच उत्सुक असते,” असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, दक्षिण कन्नडमध्ये चिन्मय जीकेने 624 गुण मिळवले. मृदुभाषी म्हणून ओळखला जाणारा चिन्मय जीके दिवसातून फक्त तीन तास अभ्यास करत असे. इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधताना त्याने सांगितलं की, “मी निश्चितपणे 620 पेक्षा जास्त गुणांची अपेक्षा करत होतो. मी सायन्समध्ये एक मार्क गमावला. मी स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिका पाहिल्यानंतर पुनर्मूल्यांकनासाठी जाईन. मी एक शास्त्रीय गायक आहे आणि जेव्हा मी अभ्यासातून ब्रेक घेतो तेव्हा मी गातो. हे मला अधिक चांगले लक्ष केंद्रित करण्यात मदत करते. मला संगणक विज्ञान अभियंता व्हायचे आहे”. त्याने आपले शिक्षक असणारे आई-वडील यांना यशाचं श्रेय दिलं आहे.
बंगळुरूचे तीन विद्यार्थी पहिल्या 10 मध्ये आले आहेत. मेधा शेट्टी (624), सौरव कौशिक (623), आणि अंकिता आनंद आंदेवाडीकर (623) अशी त्यांची नावं आहेत. बंगळुरूने देखील 2023 पासून आपल्या क्रमवारीत सुधारणा केली आहे. बंगळुरू दक्षिणने 33 वरून 12 वर आणि बंगळुरू उत्तरने 32 वरून 14 वर क्रमवारीत सुधारणा केली.