Bharat Bandh: शेतकरी संघटनांचे आज देशव्यापी आंदोलन
कृषी विधेयके राज्यसभेत मंजुरीला आल्यापासून उत्तर भारतात शेतकऱ्यांकडून तीव्र आंदोलन करण्यात येत आहे.
नवी दिल्ली: मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात आज शेतकऱ्यांकडून देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी अखिल भारतीय किसान सभा व संलग्न शेतकरी संघटनांनी भारत बंदची Bharat Bandh हाक दिली आहे. या आंदोलनात ३०हून अधिक शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत. याशिवाय, सीटू, हिंद मजदूर सभा, नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस आदी १० कामगार संघटनांनीही पाठिंबा दिला आहे. या संघटनाही बंदमध्ये सहभागी होतील.
कृषी विधेयके राज्यसभेत मंजुरीला आल्यापासून उत्तर भारतात शेतकऱ्यांकडून तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडून राष्ट्रीय महामार्ग रोखून धरले जात आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षानेही केंद्राच्या धोरणांविरोधात काँग्रेसने पुढील दोन महिने जनआंदोलन करण्याचे ठरवले आहे. त्याअंतर्गत देशभर पत्रकार परिषदा घेऊन शेतकऱ्यांची बाजू मांडली जाईल. काँग्रेससह १५ विरोधी पक्षांनीही या शेती विधेयकांना विरोध केला असून राष्ट्रपतींना या विधेयकांवर स्वाक्षरी न करता ती परत पाठवण्याची विनंती केली आहे.
तर महाराष्ट्रातही हे आंदोलन तापण्यास सुरुवात झाली आहे. केंद्राने बहुमताच्या जोरावर शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या दावणीला बांधणारी प्रक्रिया पुढे रेटली आहे. केंद्राची ही भूमिका शेती, माती व शेतकऱ्यांशी द्रोह करणारी आहे. केंद्र सरकारचे जमीन अधिग्रहण बिलात बदल करण्याचे प्रयत्न ज्याप्रकारे उधळण्यात आले त्या प्रकारे कृषी कायद्याचा अंमल करण्याचे सरकारचे प्रयत्न शेतकरीच उधळून लावतील, असे अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी सांगितले. त्यामुळे आता भाजप या सगळ्याला कशाप्रकारे सामोरे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.