नवी दिल्ली: येत्या निवडणुकीत आपण भाजपला सत्तेतून खाली खेचू आणि देशात नवे सरकार आणू, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी शेतकऱ्यांना केले. ते शुक्रवारी नवी दिल्लीतील शेतकरी मोर्चाच्या व्यासपीठावरून बोलत होते. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने आयोजित केलेल्या या मोर्चाला महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल येथून आलेल्या लाखो शेतकऱ्यांनी हजेरी लावली आहे. काही वेळापूर्वीच या मोर्चाने रामलीला मैदानावरून संसदेच्या दिशेने कूच केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तत्पूर्वी सीताराम येचुरी यांनी शेतकऱ्यांना संबोधित केले. त्यांनी म्हटले की, आपण भाजपला सत्तेतून खाली खेचू आणि देशात नवे सरकार आणू. जेणेकरून तुमच्या समस्या संसदेत मांडल्या जातील. भाजपकडे राम मंदिर नावाचे ब्रह्मास्त्र आहे. पाच वर्षांनी निवडणुका जवळ आल्या की ते हे अस्त्र बाहेर काढतात. मात्र, आता देशातील गरीब, मजूर आणि शेतकरी एकत्र आल्याचे आपण त्यांना दाखवून दिले पाहिजे. भाजप आणि संघाने नेहमीच रामाच्या नावाचा गैरवापर केला. ते नेहमी रामायणाबद्दल बोलत असतात. मात्र, त्यांना महाभारताचा विसर पडला आहे. महाभारतामध्ये पाच पांडव आपला कसा पराभव करणार, असे कौरवांना वाटायचे. मात्र, आज कोणालाही कौरव माहिती आहेत का, असे येचुरी यांनी म्हटले. 



मोदी सरकारच्या काळात कृषी क्षेत्राचा विकासदर खालावला. यूपीए सरकारच्या काळात हा दर जास्त होता, असेही सीताराम येचुरी यांनी सांगितले.