मुंबई : नवीन कृषी कायद्याच्या (New Farm Laws) विरोधात शेतकरी आंदोलन (Farmers Protest) करत आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा आठवा दिवस आहे. सिंधु, टिकरी आणि दिल्ली- उत्तर प्रदेश सीमेवर हजारो शेतकऱ्यांनी (farmers) तळ ठोकला आहे. दरम्यान, शेतकरी आणि सरकार यांच्यात चर्चेची चौथ्या फेरीची चर्चा सुरू आहे. त्याचवेळी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रकाशसिंह बादल (Prakash Singh Badal) यांनी आपला पद्म विभूषण हा पुरस्कार परत केला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात सुरू असलेल्या चर्चेत अजूनही तोडगा निघालेला नाही. याआधी चर्चा झाली मात्र, शेतकऱ्यांचे कोणतेही समाधान झालेले नाही. अजूनही शेतकरी चर्चा करत आहेत. मध्यंतरी, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या माहितीसाठी एक छोटे प्रेझेंटेशन दिले. परंतु अनेक शेतकऱ्यांनी चर्चेवर भर दिला. आमचा आवज दाबण्याचा प्रयत्न करु नये तसेच फूट पाडण्याचा प्रयत्न करु नका, असा इशारा शेतकरी संघटनांनी दिला. आम्ही घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही, असा इरादा स्पष्ट केला.


शेतकऱ्यांचा नवी कृषी कायद्याला विरोध आहे. संयुक्त शेतकरी आघाडीने १० पानांचा मसुदादेखील तयार करुन केंद्र सरकारला दिला आहे, ज्यामध्ये कृषी कायद्यावर आक्षेप घेण्यात आले आहेत.


दरम्यान, शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भाजपचा घटक पक्ष असलेला आणि सरकारमधून बाहेर पडलेला पक्ष शिरोमणी अकाली दल आक्रमक झाला आहे. एकेकाळी एनडीएचा भाग असलेले शिरोमणी अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाशसिंह बादल यांनी भारत सरकारचा पद्म विभूषण पुरस्कार परत केला आहे. 


प्रकाशसिंग बादल यांनी लिहिले आहे की, 'मी इतका गरीब आहे की माझ्यासाठी शेतकऱ्यांसाठी बलिदान देण्याशिवाय दुसरे काही नाही, मी जे काही आहे ते शेतकर्‍यांमुळे आहे. अशा परिस्थितीत जर शेतकऱ्यांचा अपमान होत असेल तर कोणत्याही प्रकारचा सन्मान ठेवण्यात काही उपयोग नाही.'


पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनीही पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी वेळ मागितला आहे. विज्ञान भवन येथे सुरू असलेल्या बैठकीत शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी सरकारला एमएसपीला हमीभाव देण्यासाठी कायदा करण्याची मागणी केली आहे.