नवी दिल्ली : शेतकरी संघटना (farmer organization) आणखी आक्रमक झाल्या आहेत. संपूर्ण देशभरात ५ डिसेंबरला आंदोलन (Farmers  Protests) करण्यात येणार आहे. दरम्यान, पंजाबमधील खेळाडू सात डिसेंबरला पुरस्कार वापसी करणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कृषी कायद्यांमधील मुद्यांवरुन उद्या पुन्हा शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा होईल, अशी माहिती कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली. तर दुसरीकडे शेतकरी संघटना देशभरात ५ डिसेंबरला आंदोलन करणार आहेत. पंजाबमधील सर्व खेळाडू ७ डिसेंबरला पुरस्कार वापसी करणार आहेत. अन्य खेळाडू आणि कलाकारांनीही पुरस्कार वापसी करण्याचं आवाहन करण्यात आले आहे. 


गेल्या सात दिवसांपासून दिल्लीमध्ये शेतकरी आपल्या मागण्यांसाठी ठिय्या देऊन बसलेत. केंद्र सरकारनं लागू केलेले कृषि कायदे तातडीनं रद्द करावेत, अशी त्यांची मागणी आहे. त्यांच्या या मागणीला आता देशभरातील शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे हे शेतकरी आंदोलन आणखीच चिघळले आहे. 


आम्ही सरकारमधील मंत्र्यांशी चर्चेला तयार आहोत. मात्र, सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका आंदोलन शेतकरी नेत्यांनी घेतलीय. त्यात आता येत्या ५ डिसेंबरला देशव्यापी आंदोलन सुरू करण्यात येणार असल्यानं हा मुद्दा आणखी तापणार आहे. हा तिढा मिटवण्यासाठी केंद्र सरकारकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.