देहरादून : लोकसभा निवडणूक २०१९ च्या प्रचाराच्या रणधुमाळीत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांसाठी आणि गरिबांसाठी केलेल्या वेगवेगळ्या कामांची यादी आणि योजनांची नावं वाचून दाखवत आहेत. दुसरीकडे मात्र, शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीत. हरिद्वार जिल्ह्यातील दाडकी गावातील आणखीन एका शेतकऱ्यानं कर्जाला कंटाळून आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याचं समोर येतंय. ईश्वरचंद शर्मा असं या ६५ वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शर्मा यांनी विष पिऊन आपलं जीवन संपवलं. पण याआधी मात्र त्यांनी एक सुसाईड नोटही लिहून ठेवलीय. यामध्ये त्यांनी भाजप सरकारवर टीका केलीय. 'भाजप सरकारनं गेल्या पाच वर्षांत शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलंय. त्यांना मत देऊ नका अन्यथा ते सगळ्यांनाच चहा विकायला लावतील' असं या चिठ्ठीत त्यांनी म्हटलंय. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या चिठ्ठीची सत्यता पडताळणी अजून सुरू आहे. 


'टाईम्स ऑफ इंडिया'नं दिलेल्या माहितीनुसार, शर्मा यांनी लिहिलेल्या या चिठ्ठीत त्यांनी दलालाच्या छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचाही उल्लेख केलाय. बँकेतून पाच लाखांचं कर्ज मिळवण्यासाठी शर्मा यांनी या दलालाची मदत घेतली होती. बँकेतून कर्ज मिळवताना याच दलालानं 'हमीदार' म्हणून सही केली होती. यावेळी त्यानं शेतकऱ्याकडून एक कोरा चेकही सही करून आपल्याकडे ठेवला होता. बँकेचं कर्ज परतफेड केल्यानंतर याच कोऱ्या चेकचा वापर करत दलाल शेतकऱ्याला ब्लॅकमेल करत होता. त्यानं शर्मा यांच्याकडे ४ लाखांची मागणी केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.  


उल्लेखनीय म्हणजे, गेल्या दोन वर्षांतील शेतकरी आत्महत्येची ही उत्तराखंड राज्यातील १७ वी घटना आहे.