लखनौ : काँग्रेसच्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी केलेल्या 'मी मुलगी आहे, मी लढू शकते' या घोषणेची उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत जोरदार चर्चा होत आहे. ही घोषणा महिलावर्गात खूपच लोकप्रिय झाली आहे. या घोषणेला उत्तर देण्यासाठी योगी सरकारने आता प्रतिक्रिया म्हणून एक पोस्टर जरी केली आहे. या पोस्टरमधून काँग्रेसवर टीका करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपने महिला सुरक्षेवर लक्ष केंद्रित केलेले हे नवीन पोस्टर जारी केले आहेत. यात अपर्णा यादव आणि भाजप खासदार संघमित्रा मौर्य यांचे फोटो देण्यात आले असून या पोस्टरला 'सुरक्षा चक्र' हे नाव दिले आहे. तर, पोस्टरच्या कॅप्शनमध्ये 'सेफ्टी जहाँ, डॉटर्स देअर' असे लिहिले आहे.


अपर्णा यादव या समाजवादी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांची सून आहे. त्यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला आहे. तर, संघमित्रा मौर्य या भाजपच्या खासदार आहेत. त्यांचे वडील स्वामी प्रसाद मौर्य हे योगी सरकारमध्ये मंत्री होते. मात्र, त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देत समाजवादी पक्षाला जवळ केले आहे.


भाजपने जारी केलेल्या या पोस्टरमध्ये या दोन्ही महिला नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. भाजप हे स्थिर आणि सुरक्षित सरकार देऊ शकते. त्यामुळेच एक सून आपल्या पक्षात आल्याचं आणि एक मुलगी पक्षातच राहिल्याचं या पोस्टरच्या माध्यमातून सांगण्यात आलंय.      


काँग्रेसच्या प्रचाराला प्रतिसाद म्हणून हे पोस्टर जारी करण्यात आले आहेत. दरम्यान, भाजप खासदार संघमित्रा मौर्य यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केल्याबद्दल वडिलांना ट्रोल करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. 


संस्कार हा चांगला शब्द आहे, पण तो कोणाकडे आहे? आठवडाभरापूर्वी वडिलांनी पक्ष बदलला आणि मुलीला खोटे ठरवले गेले. आज एका सुनेने पक्ष बदलला तर त्याचे स्वागत होत आहे. मुलगी मागास जातीतली आणि सून उच्चवर्णीय आहे याचा संबंध जोडावा का? असे ट्विट संघमित्रा मौर्य यांनी केले आहे.