केंद्राचा आज अर्थसंकल्प, अर्थव्यवस्थेत सुधारणा आणण्याचे आव्हान
पंतप्रधान मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील आज पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करणार आहेत.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील आज पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करणार आहेत. दरम्यान, त्यांच्यापुढे अर्थव्यवस्थेत सुधारणा आणण्याचे मोठे आव्हान आहे. अर्थसंकल्प सकाळी अकरा वाजता निर्मला सीतारामन सादर करतील. दरम्यान, आधीचे अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना अनेक लोकप्रिय घोषणा केल्या होत्या. त्यावेळी दिलेली आश्वासने कायम ठेवण्याचे आव्हानही सीतारामन यांच्यासमोर असणार आहे.
लोकसभा निवडणुकांपूर्वी फेब्रुवारी महिन्यात मोदी सरकारकडून अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. येऊ घातलेल्या निवडणुका लक्षात घेऊन त्या अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडण्यात आला होता. आता आज सादर होणाऱ्या 'पूर्ण अर्थसंकल्पा'कडे सर्वांचे लक्ष असून, अर्थव्यवस्थेत सुधारणा आणण्यासाठी अर्थमंत्री सीतारामन कोणते निर्णय घेतात याविषयी उत्सुकता आहे. दरम्यान, कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. केंद्र सरकारकडून शेतकर्यांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करुन दिले जाऊ शकते. अंतरिम अर्थसंकल्पावेळी सरकारने शेतकर्यांना सहा हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला होता.
गेल्या पाच वर्षात ६.८ टक्क्यांवर खालावलेला विकासदरात यंदाच्या आर्थिक वर्षांत थोडीसी वाढ झाला आहे. हा विकासदर आता ७ टक्क्यांवर जाईल, अशी अपेक्षा गुरुवारी संसदेत मांडण्यात आलेल्या आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आली आहे. आर्थिक विकासदर ८ टक्क्यांवर नेण्याचे उद्दीष्ट आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला देशाच्या आर्थिक स्थितीचे वास्तवदर्शी चित्र स्पष्ट होण्यासाठी आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर केला जातो. केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी २०१८-१९चा हा आर्थिक पाहणी अहवाल मांडला. यावळी आर्थिक विकासाची गती वाढण्याचा आशावाद व्यक्त केला आहे. गेल्या पाच वर्षांत देशाने सरासरी ७.५ टक्क्यांनी विकास साधल्याचा दावा सीतारामन यांनी केला आहे.