कोलकाता : पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातल्या तृणमूल काँग्रेसचे आमदार सत्यजीत बिस्वास यांची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी रविवारी भाजप नेते मुकल रॉय यांच्यासह चार जणांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पश्चिम बंगाल पोलिसांमधल्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्यानं ही माहिती दिली आहे. चार जणांपैकी दोन जणांना अटक करण्यात आल्याची माहितीही पोलीस अधिकाऱ्यानं दिली. सत्यजीत बिस्वास हे पश्चिम बंगाल विधानसभेच्या किशनगंज मतदारसंघाचे आमदार होते. जलपाईगुडी जिल्ह्यातील फुलबाडी येथे शनिवारी सरस्वती पूजेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी सत्यजीत बिस्वास स्टेजवरून खाली उतरत असताना अज्ञातांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिस्वास यांच्या हत्येप्रकरणी दोन जणांना अटक आणि तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. बिस्वास यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली देशी बंदूकही जप्त करण्यात आली आहे. सत्यजीत बिस्वास यांना मागून गोळी मारण्यात आल्याचं सुरुवातीच्या तपासात समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं.


नादियाची सीमा बांगलादेशला लागून आहे, त्यामुळे हल्लेखोर बांगलादेशमध्ये पळून जाण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे बांगलादेशच्या सीमेवरही हाय अलर्ट लावण्यात आला आहे.


पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्यासोबत वाद झाल्यानंतर माजी खासदार मुकुल रॉय यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तृणमूल काँग्रेसचे महासचिव पार्थ चटर्जी यांनी आमदाराच्या हत्येप्रकरणी भाजपवर आरोप केले आहेत. लोकसभा निवडणुकीआधी भाजपला गडबड करायची असल्याचा आरोप पार्थ चटर्जी यांनी केला. तर मुकल रॉय आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी हे आरोप निराधार असल्याचा दावा केला आहे. 


तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची गोळ्या झाडून हत्या