अलीगढ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये बुधवारी अखिल भारतीय हिंदू महासभेच्या काही कार्यकर्त्यांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला. हिंदु महासभेची नेता पूजा शकून पांडे आणि तिच्या सहकार्यांनी मिळून गांधीजींचा प्रतिकात्मक पुतळा उभा करुन त्यावर 3 गोळ्या झाडल्या. दरम्यान पूजा शकून पांडे ही याआधी भाजपाच्या दिग्गज नेत्यांसोबत दिसल्याचे समोर येत आहे.  तिच्या फेसबुक पोस्टमधील फोटोमध्ये ती मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्या सोबत दिसत आहे. हा फोटो तिच्या फेसबुक अकाऊंट वरून 19 मार्च 2017 ला पोस्ट केला होता पण आता तो हटवला गेला आहे. 


बुधवारी महात्मा गांधींच्या पुण्यतिथी निमित्ताने देशभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. पण मध्य प्रदेशमध्ये किळसवाणा प्रकार पाहायला मिळाला. गांधीजींच्या प्रतिकात्मक पुतळ्याला गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यातून लाल रंगाचा रक्तासारखा द्रव पदार्थ बाहेर काढला. पेट्रोल शिंपडून पुतळा जाळला आणि मिठाई वाटत आनंद साजरा केला. एवढंच नव्हे तर 'गोडसे जिंदाबाद' अशा घोषणा देण्यात आल्या. या विकृतीविरुद्ध देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.माध्यमांच्या समोर महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची अवहेलना केली गेली. त्यानंर हिंदू महासभेच्या लोकांनी फोटोसेशन देखील केले. सोशल मीडियावर या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी याची गंभीर दखल घेत एफआयआर दाखल केली. पूजा शकून आणि तिचा सहकारी अशोक पांडे सहित 13 जणांचे नाव एफआयआरमध्ये आहे. पोलिसांनी याप्रकरणी एकाच आरोपीला ताब्यात घेतले आहे. ही घटना शहरातील नौरंगाबाद जवळील पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आकाश कुल्हारी यांनी सांगितले. 
 
 या घटनेनंतर पूजा शकूनने माध्यमांशी संवाद साधला. हा नवा पायंडा असून नव्या परंपरेची ही सुरूवात असल्याचे ती म्हणाली. दसऱ्याला होणाऱ्या रावण दहनाच्या परंपरेशी याची तुलना तिने केली. नथूराम गोडसेच्या सन्मानार्थ हिंदू महासभा गांधींची पुण्यतिथी हा शौर्य दिन मानत असल्याचेही तिने स्पष्ट केले.