जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी माझ्यावर FIR, रॉबर्ट वडरांचा आरोप
खोटे गुन्हे दाखल करुन लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
हरियाणा: गुरुग्राम येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात शनिवारी गांधी घराण्याचे जावई आणि उद्योजक रॉबर्ट वडरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भुपिंदर सिंह हुडा यांच्यावरही गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे.
मात्र, रॉबर्ड वडरा यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मूळ समस्यांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी हा सर्व प्रकार घडवून आणला आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत. कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. परिणामी सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळेच अशाप्रकारे खोटे गुन्हे दाखल करुन लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. यामध्ये नवीन काहीच नाही, असे वडरा यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरिंदर शर्मा या व्यक्तीच्या सांगण्यावरून ही तक्रार दाखल करुन घेण्यात आली. तक्रारीमध्ये डीएलएफ आणि ओंकारेश्वर प्रॉपर्टीज या दोन कंपन्यांचाही समावेश आहे. रॉबर्ट वडरा यांच्या स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी या कंपनीने गुरुग्रामच्या सेक्टर ८३ मध्ये शिखोपूर, सिकंदरापूर, खेडकी दौला आणि सिही या परिसरात साडेसात कोटींना जमीन खरेदी केली होती. मात्र, त्यानंतर अचानकपणे ही जमीन अनारक्षित करण्यात आली. त्यानंतर वडरांच्या कंपनीने ५५ कोटींना जमीन विकून टाकली, असे तक्रारीत म्हटले आहे.