आग्र्याच्या भांडई रेल्वे स्थानकाजवल पातालकोट एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याने खळबळ माजली आहे. ही ट्रेन मथुरा येथून झाशीच्या दिशेने निघाली असतानाच आग लागली. ट्रेनचे दोन डबे आगीच्या भक्ष्यस्थानी आले आणि जळून खाक झाले. आग लागल्यानंतर प्रवाशांची आरडाओरड सुरु झाली होती. काही प्रवाशांनी तर जीव वाचवण्यासाठी खिडकीतून उड्या मारल्या. या आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी ही घटना घडली. भांडई रेल्वे स्थानकाजवळ पातालकोट एक्स्प्रेसला आग लागली. आग लागताच ट्रेन थांबवून प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु झाले होते. तात्काळ अग्निशमन दलाला आगीची माहिती देण्यात आली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण 9 लोक आगीत होरपळले असल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. 



आगीची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. आग नेमकी कशामुळे लागली यासंबंधी सध्या तपास सुरु आहे. अद्याप नेमकं कारण समोर आलं आहे. दरम्यान, रुळांवर असतानाच एक्स्प्रेसला आग लागल्याने या मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रेल्वे कर्मचारी सध्या हा मार्ग सुरळीत करण्यामध्ये तसंच तपासात व्यग्र आहेत. 


कशी झाली दुर्घटना?


मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन आग्रा कँट रेल्वे स्थानकावर पोहोचली आणि तेथून झाशीसाठी रवाना झाली. काही किलोमीटर दूर गेल्यानंतर ट्रेनच्या जनरल डब्यातून धूर आणि आगीचे लोट बाहेर पडताना दिसू लागले. यामुळे प्रवाशांची आरडाओरड सुरु झाली. आग लागल्याची माहिती मिळताच ड्रायव्हरने ट्रेन थांबवली आणि कंट्रोल रुमला याची माहिती दिली. 


ट्रेन थांबताच प्रवाशांनी डब्यातून उड्या मारत जीव वाचवले. तोपर्यंत दोन डबे आगीत जळून खाक झाले होते. आग पसरु नये यासाठी या डब्यांना ट्रेनपासून वेगळं कऱण्यात आलं. यादरम्यान अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोहोचले होते. वेळेत प्रवाशांचा जीव वाचवण्यात आला. यामुळे जीवितहानी टळली.