JNU हल्ला : आईशी घोषसह १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आईशी घोष हिच्यासह १९ जणांविरुद्ध दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आईशी घोष हिच्यासह १९ जणांविरुद्ध दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ४ जानेवारी रोजी विद्यापीठातील सर्व्हर रुमची तोडफोड आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याच्या आरोपात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. जेएनयू रविवारी झालेल्या हल्ल्यात आईशी घोषवर प्राणघातक हल्ला झाला होता. तिच्या डोक्यात लोखंडी रॉड घातल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, हल्लेखोरांना दिल्ली पोलिसांनी अटक केलेली नसून अद्याप ते मोकाट आहेत. तर दिल्ली पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.
दरम्यान, जेएनयूच्या संकुलात रविवारी चेहरे लपवून गुंडांनी विद्यार्थ्यांवर रात्री हल्ला केला. या हल्ल्यात ३६ जण जखमी झाले. जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष आईशी घोष यांच्यासह अनेकांना रक्तबंबाळ करणाऱ्या हल्लेखोरांच्या धुडगुसाचे चित्रण रविवारी सायंकाळी माध्यमांत प्रसारित झाल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली. त्यानंतर मुंबईत आंदोलन करण्यात आले. तसेच पुण्यातील ‘एफटीआयआय’मध्ये आणि मुंबईत गेट वे येथे रविवारी रात्रीपासूनच निदर्शने सुरू झाली. सोमवारी पाँडेचेरी ते चंदीगड आणि अलिगड ते कोलकाता येथील विद्यापीठे, उच्च शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. बंगळूरु , मुंबईतील आयआयटी, टाटा समाजविज्ञान संस्था, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, अलिगड मुस्लीम विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ, बनारस हिंदू विद्यापीठ, प्रेसिडेन्सी विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांनी निदर्शने केलीत.
जेएनयू विद्यापीठातील सर्व्हर रुमची तोडफोड आणि सुरक्षा कर्मचाऱयांवर हल्ला करण्याच्या आरोपात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, ५ जानेवारी रोजी विद्यापीठ प्रशासनाने याची तक्रार पोलिसांकडे केली होती. अखेर आज पोलिसांनी जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आईशी घोषसह १९ जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. जेएनयूत रविवारी काहीजणांनी जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थ्यांवर हल्ला केला होता. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनावर अनेकांनी टीका केली होती. त्याआधी फी वाढ विरोधी आंदोलन जेएनयू विद्यार्थी संघटनेने पुकारले होते.
या आंदोलनाचा भाग म्हणून सबमिशन्स, परीक्षांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनानंतर ४ जानेवारी विद्यापीठाच्या सर्व्हर रुमची तोडफोड करण्यात आली. ही तोडफोड जेएनयू विद्यार्थी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याचा आरोप होता. पाच जानेवारी रोजी विद्यापीठ प्रशासनाने ह्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशी घोषसह १९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.