नवी दिल्ली: जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिद याच्यावर सोमवारी हल्ला करण्याचा प्रयत्न फसला. दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा प्रकार घडला. उमर खालिद या क्लबच्या परिसरातील एका चहाच्या टपरीवर काही लोकांसमवेत उभा होता. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही उमर खालिदसह चहाच्या टपरीजवळ उभे होतो. त्यावेळी पांढरा शर्ट घातलेला एक अज्ञात माणूस आमच्याजवळ आला. त्याने सुरुवातीला उमर खालिदला ढकलले आणि त्यानंतर पिस्तूल काढून त्याच्यावर गोळी झाडली. मात्र, उमर खालिद खाली पडल्यामुळे गोळीचा नेम चुकला. आम्ही त्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पळून जाण्यात यशस्वी ठरला. या व्यक्तीने पळून जाताना हवेत गोळीबार केला. मात्र, या प्रयत्नात त्याच्या हातातून पिस्तूल खाली पडल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.



घटनास्थळापासून जवळच संसद भवन आहे. त्यामुळे अतिसुरक्षित परिसरात गोळीबार झाल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाले आहे.